‘मला लाज वाटती आई-बाबा…मी लुझर आहे, माझ्या निर्णयामुळं…आत्महत्येच्या आधी रडत-रडत रोहितने लिहिली चिठ्ठी
नाशिकः नोकरी न मिळाल्याने नैराश्यात गेलेल्या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. नाशिकमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली आहे. अवघे 22 वर्ष वय असलेल्या तरुणाने घेतलेल्या निर्णयाने त्याच्या आई-वडिलांवर दुखाःचा डोंगर कोसळला आहे. (Nashik Engineer Youth Suicide)
22 वर्षांच्या इंजिनिअरने स्वतःला संपवले
हातात पक्की नोकरी नसल्याने व आत्ता काम करत असलेल्या कंपनीतून त्याला ब्रेक देण्यात आल्यामुळं तो गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होता. याच तणावातून त्याने आज टोकाचा निर्णय घेतला आहे. रोहित वाघ असं तरुणाचे नाव असून तो नाशिक शहरातील काठे गल्ली येथे वास्तव्यास आहेत.
राहत्या घरात घेतला टोकाचा निर्णय
रोहितने राहत्या घरी सिलिंगच्या हुकाला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. आत्महत्येपूर्वी रोहितने सुसाइट नोटही लिहली होती. यात त्याने आई-वडिलांचादेखील उल्लेख केला आहे.
तणावातून तरुणाची आत्महत्या
रोहित वाघने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले होते. तो एका कंपनीत कामाला ही जात होता. मात्र त्याला पक्की नोकरी नसल्याने तो तणावात होता. त्यातच एका कंपनीतून त्याला काहीकाळासाठी ब्रेक घेण्यासही सांगितले होते. या तणावातूनच त्याने आत्महत्येचं पाऊल उचलले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, आत्महत्येपूर्वी रोहितने सुसाइट नोटही लिहली आहे. मी लुझर आहे. मी असतांनाही आई वडीलांना काम करण्याची वेळ येते ही लाजिरवाणी गोष्ट आहे’, असं त्याने चिठ्ठीत लिहलं आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. रोहितच्या आत्महत्येमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
‘मी तुमची व घराची जबाबदारी घ्यायचा हवी पण माझे काही वेगळेच सुरु आहे. माझे खूप निर्णय चुकले. त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागतो. मी २२ वर्षांचा झालो तरी तुम्हाला काम करायची वेळ येते. हे माझ्यासाठी खूप लाजिरवाणे आहे,’ असं रोहितने चिठ्ठीत नमूद केले आहे.दरम्यान, रोहितने आत्तापर्यंत केलेल्या गुंतवणुकीबाबतची माहितीही चिठ्ठीच लिहली आहे. मोबाईलचा पासवर्डसह इतर महत्त्वाच्या आर्थिक बाबींची माहिती त्यांने चिठ्ठीत लिहली आहे.