मांजरीत बापाचा आत्मा असल्याचं महिलेला वाटायचं; पतीपेक्षा मांजरीला जीव लावायची अन् सुट्टीवरुन घरी आल्यावर १००० व्होल्टचा झटकाचं बसला
नवी दिल्ली : पती-पत्नीमधील भांडणं आणि वाद अनेक वेळा इतके वाढतात की घटस्फोटापर्यंत गोष्ट पोहोचते. कधी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमुळे तर कधी पैशाच्या वादामुळे असं घडतं. पण कोणी एखाद्या पाळीव प्राण्यामुळे आपल्या जोडीदाराला घटस्फोट देऊ शकतो का? वाचून नवल वाटलं ना? मात्र वास्तविक एक महिला तिच्या पतीला घटस्फोट देणार आहे, कारण त्याने तिच्या पाळीव मांजरीला घराबाहेर काढलं. महिला फिरायला गेली असतानाच पतीने मांजरीला घराबाहेर काढलं.
या महिलेनं तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर बेंजी नावाची मांजर पाळली होती आणि हा तिच्या वडिलांचा पुनर्जन्म आहे, असं ती मानत होती. हळूहळू ती मांजराच्या प्रेमात पडली. पण आता पतीच्या या कृत्याने ती इतकी संतापली आहे, की तिला घटस्फोट घ्यायचा आहे.
दिल्लीत राहणार्या या महिलेने फेसबुकवर वर एका पोस्टमध्ये लिहिलं – मी तिला तेव्हा रेस्क्यू केलं होतं, जेव्हा ती इतकी लहान होती की ती माझ्या तळहातावर बसायची. हे काही लोकांसाठी विचित्र असू शकतं, परंतु माझा विश्वास आहे की बेंजी माझ्या वडिलांचा पुनर्जन्म आहे. जेव्हा मी तिच्या डोळ्यात पाहते तेव्हा ती मला एका मांजरीपेक्षा जास्त काहीतरी असल्याचं वाटतं.
ती पुढे म्हणाली, “माझ्या पतीला हे विचित्र आणि अस्वस्थ वाटतं. तो म्हणतो की मांजरीशी असलेलं माझं नातं त्याला घाबरवतं आणि त्याला अजब वाटतं की मी या मांजरात माझ्या वडिलांचा आत्मा आहे, हे खरं मानते. जेव्हा मी माझ्या आई आणि बहिणीसोबत सुट्टीवरून परतले तेव्हा माझ्या पतीनं मला सांगितलं, की त्याने बेंजी त्याच्या एका सहकाऱ्याला दिली.’
महिलेनं पुढे लिहिलं की – यानंतर मी त्या व्यक्तीला फोन करून माझी मांजर परत मागितली, तेव्हा त्याने म्हटलं की, तुमच्या पतीने मला ते दिलं आहे, मी ते परत करणार नाही. महिलेनं पुढे लिहिलं – ती माझी मांजर आहे, त्यामुळे माझ्या पतीला तसं करण्याचा अधिकार नव्हता. मी खूप अस्वस्थ आहे, बेंजी कधीच असं राहिली नाही आणि मला खात्री आहे की मांजरही दु:खी असेल.तिच्या पोस्टमध्ये महिलेनं पुढे लिहिलं – माझी मांजर परत मिळवण्यासाठी मी पोलिसात तक्रार दाखल करेन.
मी पतीच्या सहकाऱ्याच्या पत्नीशी याबाबत बोलले असता तिने सांगितलं की, त्यांच्या घरात अशी मांजर नाही. तेव्हा माझ्या पतीने सांगितलं की, त्यांनी तिला एका शेल्टरमध्ये सोडलं आहे. मी ताबडतोब शेल्टर शोधलं आणि माझी मांजर परत आणली. माझं कुटुंब मला आधार देत आहे.महिलेच्या पोस्टवर लोक खूप कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिलं की, तुमच्या पतीने प्लॅनमध्ये खोटं बोलण्यासाठी सहकाऱ्याला बोलावलं असताना तुम्ही परत ती मांजर शोधली. काही लोक म्हणत आहेत, की पतीने एवढा मोठा प्लॅन केला म्हणजे तो मांजरीमुळे किती त्रस्त झाला असेल.