मागच्या आठवड्यात वडिल अन् आज लाडक्या मुलीनेही घेतला अखेरचा क्ष्वास, बुलढाण्यात बघता-बघता कुंटुब उद्वस्त
बुलढाणा : आज पप्पांसोबत मीच मेहकरला जाणार. पप्पा नेहमी तुलाच घेऊन जातात. मला कधीच चल म्हणतच नाहीत. माझ्या पप्पाने मला आज सोबत चल म्हटलं. मी जाणा, पप्पा सोबत मजा करणार, असं छोट्या भावाला लाडिकपणे चिडवून वडिलांसोबत मेहकरला गेलेली भक्ती अनंताच्या प्रवासालाही पप्पांच्या पाठोपाठ गेली.
भक्तीला वाचवण्याकरिता प्रार्थनेसाठी हजारो हात जोडले गेलेले. मदतीसाठी धर्माच्या भिंती ओलांडून माणुसकी हाच एक धर्म मानत लोकांनी स्वतःहून मदत केलेली. तसेच डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न देखील तिला वाचवू शकले नाहीत.उपचाराची दिशा व्यवस्थित सुरू असताना तिला निमोनियाचा संसर्ग झाला. त्यातच तिचा रक्तदाब कमी कमी होत गेला आणि पित्याच्या पाठोपाठ चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
एक एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास नांद्रा धांडे फाट्यावर गजानन पांडुरंग मस्के आणि त्यांची मुलगी कुमारी भक्ती यांचा अपघात झाला होता. या अपघातात गजानन मस्के यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर भक्तीला गंभीर अवस्थेत छत्रपती संभाजी महाराज नगर येथे पुढील उपचारार्थ पाठविण्यात आले होते.
भक्ती या अपघातातून बरी व्हावी म्हणून सोशल मीडियावरुन केलेल्या आव्हानाला मोठा प्रतिसाद मिळाला. तब्बल अकरा लाख रुपयांच्या जवळपास मदत निधी जमा झाला होता. आमदार संजय रायमुलकर यांनी तात्काळ ५० हजार रुपयांची मदत करत यापुढे देखील काहीच कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन दिले होते. तर युवा सेनेच्या वतीने ऋषी जाधव यांनी एकवीस हजार, जिल्हा परिषद सदस्य संजय वडातकर यांनी अकरा हजार यासह विविध संघटना, शाळा, विद्यार्थी आणि समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी भक्तीच्या उपचारासाठी भरीव मदत केली होती.
भक्तीला जीवदान देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले गेले. मात्र ११ एप्रिलच्या रात्री दीड वाजता तिने एशियन हॉस्पिटल छत्रपती संभाजी महाराज नगर येथे शेवटचा श्वास घेतला. बारा एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता हिवरा आश्रम येथे तिच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.
भक्तीच्या निधनाचे वृत्त सकाळी वाऱ्यासारखे पसरले. भक्तीच्या निधनामुळे मस्के कुटुंबियासह हिवरा आश्रम, ब्रह्मपुरीसह परिसरावर शोककळा पसरली. यावेळी हजारो लोकांच्या उपस्थितीत भक्तीला अखेरचा निरोप देण्यात आला.अकरा दिवसाच्या फरकाने बाप लेकीचा झालेला करुण अंत सर्वांनाच वेदना देणारा ठरला. भक्तीच्या पश्चात आई, एक भाऊ, एक बहीण, काका असा आप्त परिवार आहे.