‘माझं जीवन खुप सुंदर आहे, पण ३… शेवट चिठ्ठी लिहली मग आरतीना होस्टेलमध्येचं प्राण सोडले

पुढारी वृत्तसेवा : अभ्यासाच्या तणावातून बीकॉमच्या विद्यार्थिनीने देवगिरी महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. ’जीवन खूप सुंदर आहे… अलविदा’ असा मथळा देऊन तिने रजिस्टरमध्ये अडीचपानी सुसाइड नोट लिहून ठेवली आहे.

तिला अभ्यासाचा तणाव असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरती सर्जेराव कोल्हे (19, रा. गुरूपिंप्री, ता. घनसावंगी, जि. जालना) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती बी. कॉम.च्या पहिल्या वर्षात शिकत होती. 25 दिवसांपूर्वीच ती वसतिगृहात राहायला आली होती. तिचे आई-वडील शेतकरी असून, तिला दोन बहिणी व एक भाऊ आहे.

वेदांतनगर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरती नुकतीच बारावी उत्तीर्ण झाली. त्यानंतर तिने देवगिरी कॉलेजमध्ये बी. कॉम.च्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतला. कॉलेज सुरू झाल्यावर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आरती देवगिरी कॉलेजमधील मुलींच्या वसतिगृहात राहायला आली. तिच्या खोलीत एकूण पाच मुली राहायच्या. ती नियमित कॉलेजलाही जात होती.

दोन दिवसांपूर्वी ती वाळूजमध्ये राहणाऱ्या तिच्या मामाकडे गेली होती. त्यानंतर शुक्रवारी ती वसतिगृहात परतली. खोलीतील इतर चार मुली कॉलेजमध्ये गेल्या होत्या, परंतु आरती खोलीतच थांबली. त्यानंतर तिने गळफास घेतला. सायंकाळी साडेपाच वाजता इतर मुली खोलीत आल्या, तेव्हा दरवाजा लोटलेला होता.

त्यांनी जोराचा धक्का देऊन दरवाजा उघडला असता आरती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. त्यानंतर वेदांतनगर पोलिसांना माहिती कळवण्यात आली. पोलिस निरीक्षक सचिन सानप, उपनिरीक्षक उत्तरेश्वर मुंडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आरतीला फासावरून उतरवले आणि घाटीत नेले. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.

मी गेल्यावर कोणीही हॉस्टेल सोडू नका
‘मी खूप साधी आहे. बारावीपर्यंत खेडेगावात शिकले. मला शहरी वातावरणाची सवय नाही. शहराशी जुळवून घेताना कुचंबणा होतेय. जीवन खूप सुंदर आहे. माझे स्वप्न टाटा-बिर्लांसारखे मोठे होण्याचे आहे… असे जीवन समृद्ध करण्याबाबत जवळपास दोन पाने लिहिल्यानंतर अर्ध्या पानात तिने ’अलविदा’ हा मथळा दिला आणि पुढे लिहिले की, माझ्या सर्व मैत्रिणी चांगल्या आहेत, पण तीन वर्षांचे बी. कॉम. आहे. सहा सेमिस्टर शिकायचे आहेत. हे झेपेल की नाही, याबाबत माझ्या मनात शंका आहेत. मी गेल्यावर कोणीही होस्टेल सोडू नका,’ असा सल्लाही तिने मैत्रिणींना दिला आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *