‘माझ्या आईला वाचवा कोणीतरी’ ,मुलगा ओरडत राहिला पण माऊली वाचली नाही ;यवतमाळमधील घटना

घाटंजी (यवतमाळ) : नेहमीप्रमाणे दिवसभर शेतात राबून ते माय-लेक घरी परत येत होते. घरी परतून ती माउली कुटुंबाच्या रात्रीच्या भोजनाची व्यवस्था करणार होती. मात्र, नियतीला ते मंजूर नव्हते. अचानक आलेल्या पावसाने गावालगतच्या नाल्याला पूर आला. त्यातून तरुण मुलाचा हात धरून येत असताना ती माउली वाहून गेली. त्यात तिचा मृत्यू झाला.

ही घटना तालुक्यातील सायतखर्डा येथे गुरुवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. सुमित्रा भाऊराव चौधरी (४६) असे पुरात वाहून मृत्युमुखी पडलेल्या त्या माउलीचे नाव आहे. सायतखर्डा येथील सुमित्रा भाऊराव चौधरी आणि त्यांचा मुलगा भुजंग (२६) हे दोघेही गुरुवारी नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेले होते.

सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास शेतातील सर्व कामे आटोपून माय-लेक संध्याकाळच्या सुमारास घराकडे निघाले होते. त्यावेळी गावाजवळील नाल्याला टोंगळभर पाणी होते. पाणी कमी असल्याने ते दोघेही एकमेकांच्या हातात हात घेऊन नाला पार करीत होते. तेवढ्यात अचानक नाल्याला मोठा लोंढा आला. त्यात एकमेकांचे हात सुटले. ते दोघेही वाहून गेले.

काही अंतरावर मुलगा भुजंगच्या हातात एका झाडाची वेल सापडली. त्याने वेलीला घट्ट धरले. त्यामुळे अनर्थथ टळला. तो कसाबसा बचावला. मात्र, त्याची आई त्याच्या डोळ्यादेखत वाहत गेली. त्याने आरडाअेारडा केला. नाल्यातून बाहेर पडून धावतच तो गावात गेला. या घटनेचे त्याने गावात माहिती दिली. गावकऱ्यांनी नाला गाठला. सुमित्रा यांचा शोध सुरू केला. शेवटी काही अंतरावर त्यांचा मृतदेहच सापडला.

गावात हळहळ, कुटुंबीय दु:खात
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तहसील प्रशासन व पारवा पोलिसांनी भेट दिली. सुमित्रा यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता येथील ग्रामीण रुग्णालय आणला. नंतर नातेवाइकांच्या स्वाधीन करून सायतखर्डा येथे अंतिम संस्कार करण्यात आले. सुमित्राच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी, एक स्नुषा असा परिवार आहे. या घटनेने सायतखर्डा येथे हळहळ व्यक्त होत आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *