‘माझ्या योगेशला डाॅक्टर व्हायचं होतं’, तरण्याबांड लेकराची शेतात बाॅडी पाहुन वडिलांचा एकचं आक्रोश
नांदेड : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळून आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. नायगाव तालुक्यातील टाकळगाव येथे ही घटना घडली. योगेश गिरी असं मृत विद्यार्थ्याचं नाव असून तो परभणी जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षण घेत होता. योगेशची हत्या झाली की त्याने आत्महत्या केली, याबाबत चर्चेला उधाण आलं आहे.
मृत योगेश गिरी हा परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथील आयुर्वेदिक महाविद्यालयात बी. ए. एम. एसचे शिक्षण घेत होता. चार दिवसांपूर्वी तो आपल्या गावी टाकळगाव येथे आला होता. रविवारी तो कोणाला काहीही न सांगता घरातून निघून गेला.
सुरुवातीला योगेश हा मित्राकडे गेला असावा असं कुटुंबियांना वाटत होतं. मात्र सायंकाळपर्यंत तो घरी परतलाच नाही. रात्री उशिरापर्यंत योगेश हा घरी परत न आल्याने कुटुंबियांची धाकधूक वाढली. मित्र तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला, पण त्याचा शोध काही लागला नाही.
मंगळवारी सकाळी परिसरातील नागरिकांना योगेशचा मृतदेह शेतातील विहिरीत तरंगताना आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच नायगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी अद्यापपर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
डॉक्टर होण्याचं स्वप्न राहिलं अपूर्ण
योगेश गिरी हा अभ्यासात खूप हुशार होता. २०२२ मध्ये तो परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथील बी. ए. एम. एस. महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षणासाठी दाखल झाला होता. वैद्यकीय शिक्षण घेत असताना सुट्टी मिळाल्याने तो गावी परतला होता. गावाकडे आल्यानंतर दररोज दोन-तीन तास शेतामध्ये जाऊन तो फेरफटका मारत असे. मात्र रविवारी तो शेताकडे गेल्यानंतर घरी परतलाच नाही. मंगळवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अकाली निधनाने त्याचं डॉक्टर होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं आहे.