माधुरीसह भाग्यश्री आता या जगात नाही, नगरमध्ये सख्या बहिणींचे फक्त मृतदेह दिसले शेजारच्यांना

घारगाव (जि. अहमदनगर) : संगमनेर तालुक्यातील खांडगेदरा (कोठे खुर्द) येथील स्वाती बाळासाहेब ढोकरे (वय २८) या विवाहितेने तीन मुलांसह विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि. ४) दुपारच्या सुमारास उघडकीस आली. भाग्यश्री बाळासाहेब ढोकरे (वय ५), माधुरी बाळासाहेब ढोकरे (वय ३) आणि शिवम बाळासाहेब ढोकरे (वय ४ महिने) अशी मृत मुलांची नावे आहेत.

संगमनेर तालुक्यातील खांडगेदरा येथे बाळासाहेब ढोकरे हे आई, वडील, पत्नी, मुलांसह राहतात. कुटुंबासमवेत शेती व्यवसाय करतात. शुक्रवारी सकाळी बाळासाहेब हे आईसोबत लग्नसमारंभासाठी बाहेरगावी गेले होते. त्यांचे वडील गणपत ढोकरे हे शेतात खुरपणीचे काम करत होते. स्वाती व तीन मुले घरीच होते. दुपारच्या वेळी गणपत ढोकरे हे जेवणासाठी शेतातून घरी आले. घरी कोणीही दिसेना म्हणून त्यांनी आजूबाजूला शोध घेण्यास सुरुवात केली.

घरालगतच्या विहिरीजवळ त्यांची सून स्वाती यांची चप्पल त्यांना दिसली. गणपत ढोकरे यांना शंका आल्याने त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना सुनेसह तीनही नातवांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळले.याबाबत गणपत ढोकरे यांनी पोलीस पाटील दत्तात्रय ढोकरे यांना कळविले. पोलीस पाटील ढोकरे यांनी घारगाव पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस नाईक राजेंद्र लांघे, संतोष खैरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी घटनास्थळी जात पाहणी केली. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढत पंचनामा केला. मृतदेह शविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आले. याप्रकरणी मच्छिंद्र खांडगे यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील हे करीत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *