‘मी त्यांना राख होताना पाहू शकत नाही’, अंत्यसंस्कारावेळी शहीद पतीच्या चितेवर झोपली पत्नी अन्..

रायपूर : छत्तीसगडच्या दंतेवाडा येथील नक्षलवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. या घटनेनंतर, शुक्रवारी दंतेवाडाच्या कासोली गावात एक हृदयद्रावक दृश्य पाहण्यात आलं. शहीद जवान लखमू मारकम यांच्या पत्नीने अंत्यसंस्कार सुरू असतानाच त्यांच्या चितेवर पडून म्हटलं की मी माझ्या पतीला अशी राख होताना पाहू शकत नाही. हे पाहून उपस्थित सर्वांच्या डोळ्यात अश्रू तरळले. महिला आणि लहान मुलांसह मोठ्या संख्येने आदिवासी लोक त्यांचा स्थानिक हिरो लखमू मारकम यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले होते.

दंतेवाडा येथे बुधवारी झालेल्या माओवाद्यांच्या हल्ल्यात मारकमसह 10 जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) जवान शहीद झाले. अंत्यसंस्कारावेळी शहीद जवान लखमू मारकम यांचे कुटुंबीय त्यांच्या पार्थिवाजवळ उभे होते. मात्र त्यांची पत्नी चितेवर पडून होती. जेव्हा लोकांनी तिला चितेवरून खाली उतरण्यास सांगितलं तेव्हा तिने सांगितलं, की ती तिच्या पतीची राख होताना पाहू शकत नाही.

रडत रडत तिने लोकांना म्हटलं, की आधी मला जाळून टाका. हे पाहून उपस्थित सर्वांच्या डोळ्यात अश्रू तरळले. मात्र, नंतर गावकऱ्यांनी महिलेला चितेवरून खाली उतरवण्यास सांगितलं आणि त्यानंतर मारकम यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शहीद जवान लखमू मारकम हे प्रशिक्षित सैनिक होते आणि पूर्वी माओवादी कारवायांचा मुकाबला करण्यासाठी स्थापन केलेल्या ‘सलवा जुडूम’ या स्थानिक आदिवासी गटाशी संबंधित होते. मात्र, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर 2011 मध्ये हा गट बरखास्त करण्यात आला. दंतेवाडा जिल्ह्यात 2015 मध्ये छत्तीसगड सरकारने स्थापन केलेल्या DRG मध्ये लखमू मारकमचा नंतर समावेश करण्यात आला. डीआरजी हे एक विशेष पोलीस दल आहे, ज्यामध्ये बहुतांश स्थानिक आदिवासी आणि आत्मसमर्पण केलेले माओवादी असतात.

माओवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या 10 DRG जवानांपैकी पाच आत्मसमर्पण केलेले माओवादी होते, जे शस्त्रं टाकल्यानंतर विशेष दलात सामील झाले होते. स्थानिक आदिवासींचा DRG मध्ये समावेश केला जातो, कारण ते त्या भागाला चांगले जाणतात आणि त्यांना त्यांच्या क्षेत्रातील माओवादी कारवायांची अधिक माहिती असते. डीआरजी टीमने वेळोवेळी माओवाद्यांविरोधात अनेक ऑपरेशन केले आहेत. त्यामुळे माओवाद्यांनी त्यांना लक्ष्य केलं.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *