‘मी मुलगा म्हणून काही करू शकलो नाही अन् माझ्या… MPSCचा अभ्यास करणाऱ्या विजयचा धक्कादायक शेवट
पुणे : पुण्यात तरुणांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरात आज पुन्हा एकदा महाविद्यालयीन विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नैराश्यातून त्याने हे पाऊल उचलले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. विजय तुकाराम नांगरे (वय २१, रा. सामाजिक न्याय वसतीगृह, विश्रांतवाडी, मूळ गाव परभणी) असं या आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे.
तरुणाच्या आत्महत्येच्या घटनेनंतर विश्रांतवाडी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळी विश्रांतवाडी पोलीस दाखल झाले आहेत. आत्महत्या झालेल्या ठिकाणी पोलिसांना एक सुसाईड नोट आढळली आहे. त्यामध्ये विजय नांगरे याने आपल्या आत्महत्येचं कारण लिहिलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय तुकाराम नांगरे हा मूळचा परभणीचा राहणारा आहे. पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयात बी. ए. च्या द्वितीय वर्षात तो शिक्षण घेत होता. तसंच तो एमपीएससीच्या परीक्षेचाही अभ्यास करत होता. विजय हा विश्रांतवाडी येथील सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहात वास्तव्यास होता. आज सकाळी विजयने वसतीगृहाच्या पाचव्या मजल्यावर अभ्यासिकेतील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.
हा प्रकार इतर विद्यार्थ्यांच्या लक्षात आल्यानतंर वसतीगृहात मोठी खळबळ वाजली होती. त्यानंतर वसतीगृहातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना संपर्क केला. या घटनेची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी विजय जिथं राहात होता त्या खोलीची झडती घेतल्यानंतर एक सुसाईड नोट हाती लागली आहे.
सुसाईड नोटमध्ये काय लिहिलंय?
सुसाईड नोटमध्ये विजयने लिहिलं आहे की, ‘मी माझ्या मर्जीने आत्महत्या करत आहे. मी मुलगा म्हणून, भाऊ म्हणून मी काही करू शकलो नाही,’ असं त्याने म्हटलं आहे.
दरम्यान, विश्रांतवाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रे भापकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वीही विजयने नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तसंच नंतरही दोन ते तीन वेळा विविध प्रकारे त्याने जीवन संपवरण्याचा प्रयत्न केला आणि आता अखेर गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेचा तपास विश्रांतवाडी पोलीस करत आहे.