मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, भरधाव टेम्पोची बाईकला जोरदार धडक; धुळ्यातील सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू
धुळे : मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहतूक टेम्पोने एका दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन जण ठार झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी १८ एप्रिल रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास मुंबई – आग्रा महामार्गावरील हॉटेल यश प्रेसिडेंट येथे हा अपघात घडला. याप्रकरणी बुधवारी सायंकाळी चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनला टेम्पो चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघातात नामदेव मोरसिंग जाधव (३५) आणि सुकदेव मोरसिंग जाधव ( वय ३२) हे दोन्ही सख्खे भाऊ या भीषण अपघातात जागीच ठार झाले आहेत. हे दोन्ही भाऊ दळवेल, ता. पारोळा इथे राहणारे होते.
नामदेव आणि सुकदेव जाधव हे दोघे भाऊ दुचाकीने (क्र.एम.एच. १५-एए २२२८) पारोळाकडे जात असताना मागून येणाऱ्या टेम्पोने (क्र.एम.एच.०६-बीजी ४१५७) जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही जखमी झाले. त्यांना तातडीने धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तोपर्यंत दोघा भावांचा मृत्यू झाला होता.
अपघात झाल्यानंतर टेम्पो चालक वाहन सोडून फरार झाला आहे. याप्रकरणी स्वप्नील श्रावण जाधव (रा. दळवेल) यांनी दिलेल्या तक्रारीवरून धुळ्यातील चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनला वाहन चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच फरार झालेल्या चालकाचा शोध आता चाळीसगाव रोड पोलीस करत आहेत. अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक संदीप ठाकरे यांनी दिली आहे.