मुलगा बारावीत पहिला; पण, पाठीवर शाबासकी नाही तर बापाचं पार्थिव खांद्यावर घेण्याची मुलावर वेळ, जळगाव हळहळलं
जळगाव: चारचाकीवरुन चालकाचे नियंत्रण सुटून गाडी झाडावर धडकल्याने चारचाकीतील एकाचा मृत्यू तर चालक गंभीर जखमी झाला आहे. जामनेर वाकडी रस्त्यावर शहापूरजवळ मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. आनंदा भीमराव जगताप (रा. भारुडखेडा ता. जामनेर) असे मयताचे नाव आहे. दरम्यान, गुरुवारी आनंदा जगताप यांच्या मुलाचा बारावीचा निकाल जाहीर झाला.
या निकालात मुलगा हा शाळेतून पहिला आला. मात्र हा निकाल तसेच पोराचं यश पाहण्यापूर्वीच मध्यरात्री काळाने झडप घातली व आनंदा जगताप यांचा मृत्यू झाला.जामनेर तालुक्यातील भारुडखेडा येथे आनंदा जगताप हे कुटुंबासह वास्तव्यास होते. बुधवारी आनंदा जगताप हे त्यांचे मित्र दिपक शेळके यांच्यासोबत मॅजिक या चारचाकीने कामानिमित्ताने बाहेरगावी गेले होते.
काम आटोपून घराकडे परतत असतांना रात्री अडीच वाजेच्या सुमारास जामनेर तालुक्यातील जामनेर वाकडी रस्त्यावर चारचाकीवरुन नियंत्रण सुटल्याने चारचाकी ही रस्त्यालगत झाडावर आदळली. झडक एवढी जोरदार होती की, या अपघातात आनंद जगताप यांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक दीपक शेळके हे गंभीर जखमी झाली.
जखमी दिपक शेळके यांच्या माध्यमातून माहिती नातेवाईकांना कळल्यानंतर नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. जगताप तसेच जखमी शेळके यांना जळगाव येथे रुग्णालयात हलिवले. याठिकाणी आनंदा जगताप यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. शेळके यांच्यावर जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघाताबाबत जामनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक रामदास कुंभार हे करीत आहेत.
आनंदा पाटील यांचा मुलगा गणेश जगताप हा बारावीला होता. भारुखेडा येथील राणिदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत आहे. ज्या रात्री अपघात झाला, त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी बारावीचा निकाल हा जाहीर झाला. यात गणेश जगताप याला ८३.५० टक्के एवढे गुण मिळाले. व तो शाळेतून तसेच तालुक्यातून कला विभागातून पहिल्या तीन मध्ये उत्तीर्ण झाला.
मुलगा गणेश याचे यश बघण्याआधीच अपघातात वडीलांचा दुर्देवी मृत्यू झाला. वडीलांच्या मृत्यूने शाळेत पहिल्या आल्याच्या मुलाच्या आनंदावर विरजण पडले असून त्याच्यावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. दरम्यान गणेश याच्या शाळेतील प्राचार्य तसेच शिक्षकांनी गणेशच्या घरी भेट त्यांचे सात्वंन केले. मुलगा शाळेतून पहिल्या आल्याचा आनंद आणि त्याच दिवशी त्याच्या वडीलांच्या निघालेल्या अंत्ययात्रेने संपूर्ण गाव सुन्न झाले असून या घटनेने सर्वत्र हळहळ वक्त केली जात आहे.