‘येतो बेटा थोड्या वेळात! बाबाची मुलं वाट पाहत राहिले, पण परतलं पित्याचं पार्थिव; बापाचं छत्र हरपलं

जळगाव : खाजगी बसचा चालक ट्रीप सोडल्यानंतर बस उभी करुन दुचाकीने घराकडे परतत येत होता. जळगाव शहरापासून जवळ असलेल्या पाळधी गावाजवळ समोर अचानकपणे उभ्या राहिलेल्या आयशर ट्रकचा अंदाज न आल्याने त्यावर धडकून दुचाकीस्वार खाजगी बसच्या चालकाचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास हा विचित्र अपघात घडला.

संदीप गोरख देसले (वय-३५ वर्ष, रा. कुसुंबा ता. जि. जळगाव) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कुसूंबा येथील रहिवासी संदीप देसले हा तरुण खाजगी बसवर चालक म्हणून कामाला होता. त्यावर त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह तो भागवत होता.

नेहमीप्रमाणे तो रविवारी कासोदा येथून खाजगी बस घेऊन सुरत येथे ट्रीपवर गेला होता. सोमवारी पहाटे तो बस घेऊन सुरत येथून कासोदा येथे परतला. त्यानंतर संदीप याने खाजगी बस कासोदा येथे उभी करुन तो त्याच्या दुचाकीने जळगाव तालुक्यातील कुसूंबा येथे घराकडे येण्यासाठी निघाला.यादरम्यान पाळधी गावाजवळ वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांकडून वाहनांची तपासणी करण्यात येत होती.

वाहतूक पोलिसांनी तपासणीसाठी एका आयशर ट्रकला थांबविले. या ट्रकच्या मागेच संदीप हा दुचाकी घेऊन चालत होता. पोलिसांनी हात दिल्याने आयशर ट्रक अचानक थांबला, आयशर ट्रक थांबल्याचा संदीप यास अंदाज न आल्याने त्याची दुचाकी अचानक समोर उभ्या राहिलेल्या आयशर ट्रकवर धडकली. यात संदीपच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीने संदीप यास तात्काळ रुग्णालयात हलविले, मात्र रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले.

दोन्ही मुलांचे पितृछत्र हरपले
संदीप हा दुचाकीने घराकडे निघाल्यानंतर त्याची पत्नी व मुले घरी त्याची वाट बघत होते, मात्र घरी पोहचण्यापूर्वीच संदीपवर रस्त्यात काळाने झडप घातली व त्याचा मृत्यू झाला. यादरम्यान संदीपचा अपघात झाल्याची माहिती मिळाल्यावर संदीपच्या पत्नीने हंबरडा फोडला. या घटनेबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत संदीप याच्या पश्चात आई अरुणाबाई, वडील गोरख देसले, भाऊ दीपक, पत्नी सोनाली आणि ज्ञानेश्वरी व दर्पण ही दोन मुले असा परिवार आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *