राम मंदिरासाठी कोटींचं दान दिल्यानं चर्चेत, महंत कनक बिहारी दास महाराजांचा मृत्यू,नेमकं काय घडलं?
भोपाळ : मध्य प्रदेशच्या नरसिंहपूर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बरमान-सगरी राष्ट्रीय महामार्ग ४४ वर एक भीषण अपघात झाला. या घटनेत महंत कनक बिहारी महाराज यांचं निधन झालं. दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांची कार दुभाजकाला धडकली यामध्ये महंतांसह तिघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरु केली आहे. मध्यप्रदेशमधील बड्या राजकीय नेत्यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
महंत कनक बिहारी दास महाराज उत्तर प्रदेशातील अयोध्येत सुरु असलेल्या राम मदिंराच्या बांधकामाला १ कोटी रुपयांची देणगी दिल्यानंतर चर्चेत आले होते. या महंतांचा आश्रम मध्य प्रदेशच्या छिंदवाड़ा जिल्ह्यातील नोनीमध्ये होता. कनक महाराज उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून छिंदवाड़ा कडे निघाले होते. बरमान-सगरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
रघुवंशी समाजाचे नरसिंहपूर जिल्हाध्यक्ष अध्यक्ष राजकुमार रघुवंशी यांनी महंत कनक महाराजांनी १ कोटी रुपयांचं दान राम मंदिराला दिलं होतं, असं म्हटलं. याशिवाय महाराज १० फेब्रुवारी २०२४ ला अयोध्येत ९ कुंडीय यज्ञ करणार होते. त्यासाठी ते विविध भागांचा दौरा करत होते. महंत छिंदवाड़ाकडे निघाले होते त्यावेळी गुना जिल्ह्यात एका दुचाकीला वाचवताना त्यांची कार दुभाजकाला धडकली त्यात त्यांच्यासह तिघांचा मृत्यू झाला.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, माजी मुख्यमंत्री कमलनाथ, केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल, यांच्यासह इतर नेत्यांनी महंत कनक बिहारी दास यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
रघुवंशी समाजावर दुखाचा डोंगर
महंत कनक बिहारी दास महाराज यांच्या निधनानं रघुवंशी समाजावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाची बातमी कळताच अनेक जण करेल-बरमानसाठी रवाना झाले.
दरम्यान, अयोध्येत राम मंदिराचं बांधकाम सुरु आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राकडून मंदिराचं बांधकाम केलं जात आहे. राम मंदिराच्या कामाचं भूमिपूजन ऑगस्ट २०२० मध्ये करण्यात आलं होतं. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते.