लग्न होतं नसल्याने २२ वर्षीय अक्षयनी आंब्याच्या झाडाला घेतला गळफास, आई-वडिलांनी केला आक्रोश
परभणी : पूर्णा तालुक्यातील देगांव येथील एका २२ वर्षीय तरुणाने लग्न होतं नसल्याने नैराश्येच्या भावनेतून आत्महत्या केल्याची घटना ९ तारखेला शनिवारी रोजी पहाटे घडली असून, याप्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अक्षय कैलास वळसे वय २२, असं मयत तरुणाचं नाव आहे.
परभणीच्या पूर्णा तालुक्यातील देगांव येथील अक्षय वळसे हा मागील काही दिवसांपासून आपला विवाह होत नसल्याने नैराश्याने ग्रासला होता. त्यातच अक्षय याला दारुचंही व्यसन लागलं होतं. शनिवारी रोजी तो घरुन पहाटे ५ वाजता उठून शेतात दुध आणण्यासाठी जातो म्हणून आपल्या शेत शिवार सुरवाडी येथिल गट क्रं.२१५ मध्ये गेला होता. परंतु तो सकाळी उशिरा पर्यंत घरी न आल्याने कुटुंबीयांनी शेतात जाऊन पाहिले असता त्याने दोरीने आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले.
याची माहिती मयताचे नातेवाईक रुस्तुम रामचंद्र वळसे यांनी पूर्णा पोलीसांना दिली. घटनास्थळी पूर्णा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड व जमादार मुजुमुले पो.ना.नागनाथ पोते आदींनी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.