लाडक्या भावाला वाचवलं पण दुर्गानी पहाटे घेतला जगाचा निरोप, कोणताही विचार न करता…
बुलढाणा: आपल्या थोरल्या भावाला यकृत दान करत भाऊबीजेची बहिणीने दिलेले भावाला अमूल्य भेट सर्वत्र चर्चेत असतानाच अचानक दुर्गारूपी त्या बहिणीने या जगाचा निरोप घेतल्याने संपूर्ण गावामध्ये शोककळा पसरली आहे. हृदय हेलावून टाकणारी ही घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, अंढेरा येथील रमेश नागरे (वय वर्ष ४८) हे शेतीसह हॉटेल व्यवसाय करतात. २०१९ पासून ते पोटाच्या विकाराने त्रस्त होते. त्यांनी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तपासणी केली असता यकृतामध्ये अडचण असल्याचे निदान झाले. यकृताचा काही भाग त्यांना मिळणे आणि त्याचे प्रत्याराोपण होणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार त्यांना आवश्यक असलेले यकृत घटक कोण देणार याबाबत कुटुंब आणि नातेवाइकांत चर्चा झाली.
यासाठी अनेकांचा रक्तगट तपासला, त्यात बहीण दुर्गा धायतडक यांचा रक्तगट रमेश यांच्याशी मॅच झाला. दुर्गा या रमेश यांच्या धाकट्या बहीण आहेत. या आधुनिक दुर्गाने कोणताही विचार न करता आपल्या थोरल्या भावाला जीवदान देण्याचे ठरविले.
बहिणीची चटका लावून जाणारी एक्झिट :
मुंबई येथील एका नामांकित खासगी रुग्णालयात हे यकृताचे प्रत्यारोपण झाले. बहिणीच्या त्यागामुळे भावाचे जीवन दिवाळीत प्रकाशमय झाले. रमेश यांना दोन महिने पुढील उपचार घ्यावे लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर अनेक तपासण्या बाकी असल्याने व वैद्यकीय काळजी म्हणून दुर्गा यांना डॉक्टरांनी मुंबईत राहण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार दुर्गा या मुंबईतच होत्या. गुरुवारी पहाटे त्यांना रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले मात्र सकाळी त्यांची तब्येत खालावली. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. मात्र, हे सारे उपचार व्यर्थ ठरले.
दुर्गा यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी व आप्त परिवार आहे. मोठ्या भावाला जीवनदान देणाऱ्या बहिणीच्या अशा अकाली मृत्यूमुळे जिल्ह्यासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.