लातूरच्या जवानाला कर्तव्यावर असताना वीरमरण, १७ वर्ष भारतमातेची सेवा, जिल्ह्यावर शोककळा

लातूर : महाराष्ट्रातील तरुण मोठ्या संख्येनं भारतीय सैन्यदलात कार्यरत आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यातील तरुण सैन्यदलातील सेवेला प्राधान्य देत असतात. लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील जवान संभाजी केंद्रे अरुणाचल प्रदेशमध्ये सेवा बजावत होते. भारतीय सैन्यदलात ते १७ वर्षांपासून कार्यरत होते. त्यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच केंद्रेवाडी सह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

लातूर जिल्ह्यातील चाकुर तालुक्यातील केंद्रेवाडी येथील जवान संभाजी केंद्रे अरुणाचल प्रदेश येथे सेवा बजावत होते. सेवा बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव लातूरला आणण्यात येत असून त्यांच्या मूळ गावी केंद्रेवाडी येथे रविवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच केंद्रेवाडी गावात शोककळा पसरली.

संभाजी केंद्रे गेल्या दोन वर्षांपासून अरुणाचल प्रदेशात सेवा बजावत होते. संभाजी केंद्रे यांना दिनांक १३ जुलै रोजी रात्री ९ वाजता हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी केंद्रे यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपचार सुरू असताना दुपारी बाराच्या सुमारास त्यांना दुसरा हृदयविकाराचा झटका आला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला.

संभाजी केंद्रे गेल्या १७ वर्षे भारतीय सैन्यात सेवा देत होते. त्यांनी आतपर्यंत जम्मू काश्मीर, भोपाळ, श्रीनगर, अहमदनगर येथे सेवा बजावली आहे. संभाजी केंद्रे यांनी शेवटच्या श्वासापर्यंत भारतमातेची सेवा केली. सैन्यदलात सेवा बजावत असताना त्यांना वीर मरण आले. शहीद संभाजी केंद्रे यांच्या पश्चात वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. केंद्रे यांच्या निधनाचे वृत्त गावात समजताच गावात शोककळा पसरली आहे.

धीरज देशमुख यांच्याकडून आदरांजली
आमदार धीरज देशमुख यांनी संभाजी केंद्रे यांना आदरांजली वाहिली. “आपल्या लातूर जिल्ह्याचे सुपुत्र, जवान संभाजी हरिबा केंद्रे (चाकुर) यांना अरुणाचल प्रदेश येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. गेल्या १७ वर्षांपासून ते सैन्यदलात कार्यरत होते. या काळात देशसेवेसाठी त्यांनी केलेल्या कार्याला व त्यागाला सलाम! केंद्रे कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत”, अशा भावना धीरज देशमुख यांनी व्यक्त केल्या.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *