लेकीला डाॅक्टर करण्यासाठी बापाची रात्रदिवस धडपड, तनिषा गेली कळताचं बाप पडला बेशुध्द
अहमदाबाद: गुजरातच्या जामनगरमध्ये काही दिवसांपूर्वीच हार्ट स्पेशॅलिस्ट डॉक्टर गौरव गांधी यांचा हृदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. ही घटना ताजी असताना आता नवसारीमध्ये १७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. नवसारी जिल्ह्यातील परतापोरग गावातील एबी स्कूलमध्ये इयत्ता बारावीत शिकत असलेल्या विद्यार्थिनीचा मधल्या सुट्टीत मृत्यू झाला. हृदय विकाराचा झटका आल्यानं तिचं निधन झालं. या घटनेमुळे तरुणांना असलेला हृदय विकाराचा धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
अवघ्या १७ वर्षांच्या मुलीला हृदय विकाराचा झटका आल्यानं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. एबी शाळा प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, १७ वर्षांची तनिषा गांधी बारावीची विद्यार्थिनी होती. महाविद्यालयीन शिक्षण घेता घेता ती नीटची तयारी करत होती. तिला डॉक्टर व्हायचं होतं. सोमवारी मधल्या सुट्टीत तनिषा तिसऱ्या मजल्यावरुन चौथ्या मजल्यावर जात होती. त्यावेळी अचानक तिला धाप लागली. तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.
तनिषा एकाएकी जिन्यावर कोसळली. शाळेतील कर्मचाऱ्यांनी तिला रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. विद्यार्थिनीचा एकाएकी मृत्यू झाल्यानं शाळेवर शोककळा पसरली. तनिषाच्या शिक्षकांनी, तिच्या मित्र परिवाराला अश्रू अनावर झाले. तनिषा अतिशय गुणी आणि हुशार मुलगी होती, असं तिच्या शिक्षकांनी सांगितलं.
हृदय क्रिया अचानक बंद पडल्यानं तनिषाचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक कारण डॉक्टरांनी सांगितलं. तनिषाच्या मृत्यूचं नेमकं कारण तिच्या शवविच्छेदन अहवालातून समोर येईल. तनिषाच्या आईचा मृत्यू कोविड काळात झाला. त्यानंतर घरात केवळ तनिषा आणि तिचे वडिलच होते. तनिषाचे वडील तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कष्ट घेत होते. आधी पत्नी आणि आता लेक गेल्यानं त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तनिषाच्या मृत्यूबद्दल समजताच ते बेशुद्ध पडले.