वडिल काठीने पायावर मारतात…बसं आम्हा दोघांना जगु द्या आता ; सायलीसह अतुलनी भरदिवसा घेतलं विष
अकोला : अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेल्याप्रकरणात उरळ पोलिसांनी एका तरुणाविरूद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.रविवारी दुपारी प्रेमी युगुलाने उरळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.दोघांनाही रूग्णालयात दाखल केले.मात्र,उपचारादरम्यान २३ वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय.स्टेशनमधील पीएसआयच्या दबावामुळे भावाने आत्महत्या केल्याचा आरोप मृताच्या भावाने केला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
अकोला जिल्ह्यातील सांगवी खुर्द येथील अतुल संजय वायधने(वय २३) याचं बाळापुर तालुक्यातील सायली(बदललेले नाव) या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबध होते.हि बाब मुलीच्या कुटुंबाला समजली.त्यामुळे मुलीवर दबाव आणुन कुटुंबीयांनी अतुलविरूद्ध उरळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.त्यानंतर पोलिसांनी ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.पुढं ३१ तारखेला युवकाने मुलीस पळवुन पुण्याला नेले.
याप्रकरणातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.त्यानंतर तरुण मुलीला घेऊन १६ तारखेला शिवसेना वसाहतीत राहणाऱ्या मावशीकडे आला होता.२० रोजी मुलीसोबत तरुण उरळ पोलीस ठाण्यात हजर हाेणार होता.परंतु पोलीस ठाण्यात हजर होण्यापुर्वीच दोघांनी विष पिले.प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरच दोघे कोसळल्याने पोलिसांनी त्यांना तात्काळ हाॅस्पिटलमध्ये भरती केले.मात्र उपचारादरम्यान अतुल वायधने याचा मृत्यू झाला.तर सायली मृत्यूशी झुंज देत आहे.याप्रकरणात पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
मुलीने लिहलेली चिट्ठी
घरच्यांच्या दबावमुळे मी अतूलविरुध्द पोलिसांत खोटी तक्रार दिली.माझं अतुलवर खुप प्रेम आहे आणि आम्ही लग्न करणार होतो.एक दिवस आम्ही दोघे बोलत असताना काकांना दिसलो आणि काकांनी मला आणि अतुललाही मारहाण केली.जेव्हापासुन आमचं प्रेम प्रकरणाबाबत घरच्यांना माहिती पडलं तेव्हापासुन त्यांच्याकडून आम्हाला प्रचंड त्रास झाला.सतत आम्हाला टोमणे मारायचे.
माझे वडिल काठीने माझ्या पायावर मारायचे.जेवण सुद्धा द्यायचे नाही आणि शाळाही बंद केली.शेतात पाठवायचे.शाळेसाठी लागणाऱ्या वह्या-पुस्तकांसाठी घरच्यांना पैशाची मागणी केली,पण त्यांना वाटायचं की मी अतुलसाठी पैसे मागते.असह्य त्रास मला घरी भोगावा लागत होता.त्यामुळं अतुलला म्हटलं मला इथुन घेऊन जा,अन्यथा मी जीव देईल.तेव्हा तो मला पुण्याला घेऊन गेले.त्यात पोलीस अतुलच्या घरच्यांना प्रचंड त्रास देत होते.
तु त्या दोघांना घेऊन ये नाहीतर तुलाच आत टाकू,अशी धमकी पोलिस अतुलच्या मोठ्या भावाला द्यायचे.आता आम्ही दोघेही या गोष्टींना कंटाळलो आहोत.त्यामुळे माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला उरळ पोलीस जबाबदार राहतील.बस आता आमच्या दोघांना जगु द्या,आमचं लग्न लावुन द्या एवढीच माझी इच्छा आहे.