संभाजीनगरमध्ये कॅरम खेळल्यानंतर भावानीचं लहान बहिणीसह भावाचा बाथरुममध्ये चिरला गळा, संतापजनक कारण शेवटी सापडलचं
औरंगाबाद: सातारा परिसरातील कनकोरबेन नगर येथील खंदाडे-राजपूत खून प्रकरणाचा उलगडा करण्यास गुन्हे शाखेला यश आले आहे. सख्ख्या चुलत भावाने आणि मेव्हण्याने सोन्याच्या लालसेपोठी बहीण, भावाचा गळा चिरून खून केल्याचे समोर आले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. खुनाची घटना नऊ जून रोजी सायंकाळी घडली होती. गुन्हे शाखेने शास्त्रशुद्ध पद्धतीने तपास करून आरोपींना दोन दिवसांत शोधून काढले.
सातारा परिसरातील कनकोरबेननगर येथे मंगळवारी रात्री आठ वाजता सौरभ लालचंद खंदाडे राजपूत (१७) आणि किरण लालचंद खंदाडे राजपूत (१९) यांचा खून झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खून परिचित व्यक्तीने केल्याचा पोलिसांना सुरुवातीपासून संशय होता.
मोबाइल आणि सीसीटीव्ही यांच्या तपासामध्ये काही तांत्रिक माहिती समोर आली. त्यावरून पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावला. मुकुंदवाडी परिसरातून मारेकरी चुलत भाऊ सतीश काळुराम खंदाडे-राजपूत (२०, रा. पाचणवडगाव, जि. जालना) आणि अर्जुन देवचंद राजपूत (२५, रा. रोटेगाव रोड, वैजापूर) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.
अर्जुन राजपूत हा मेहुणा असून, सतीश राजपूत हा सख्खा पुतण्या आहे. अर्जून हा गवंडीकाम करतो. ‘लॉकडाऊन’पासून तो सासरी पाचणवडगाव येथे राहत होता. खंदाडे यांची पाचणवडगाव येथे शेती आहे. त्यांच्या पत्नी ‘एलआयसी’मध्ये प्रतिनिधी आहेत. काही दिवसांपूर्वी लालचंद खंदाडे यांनी शेतीचा काही भाग विकला होता. यातून त्यांच्या पत्नीने सोने खरेदी केले होते. ही बाब दोन्ही आरोपींना सलत होती. त्यांच्या घरी डल्ला मारायचाच हा त्यांचा बेत होत पूर्वीपासून होता.
नऊ जून रोजी त्याला ही संधी चालून आली. लालचंद यांनी गावी बोलावल्यामुळे त्यांच्या पत्नी, थोरली मुलगी सपना पाचणवडगावला सकाळी सहाच्या सुमारास औरंगाबादहून निघाल्या. त्या गावी पोचल्याचे आरोपींनी पाहिले. त्यानंतर दोघे दुचाकीवर औरंगाबादला निघाले. जालन्यावरून एक चाकू व कोयता खरेदी केला. दुपारी १२च्या सुमारास दोघेही लालचंद यांच्या कनकोरबेननगरातील बंगल्यावर पोचले. ओळखीचे असल्यामुळे त्यांना किरण आणी सौरभ यांनी घरात घेतले.
असा केला खून
घरात चहापाणी झाल्यानंतर खाली सगळे कॅरम खेळले. सायंकाळी पाच वाजता किरण वरच्या खोलीत निघून गेली. यावेळी सतीशने मला हात धुवायचे, असे सौरभला सांगत स्वच्छतागृहाकडे नेले. तो साबण देत असताना त्याचा गळा चिरण्यात आला; तसेच हातावर कोयत्याचा वार करण्यात आला. तो ओरडत असताना किरण खाली पळत आली. यावेळी सतीशने तिला केस ओढत स्वच्छतागृहात नेले. तेथे तिचा देखील गळा चिरण्यात आल्याने दोघांचा मृत्यू झाला. खून केल्यानंतर आरोपींनी कपाटील सोन्याच्या दागिन्याची बॅग, रोख साडेसहा हजार आणी किरणचा मोबाइल घेऊन दुचाकीवरून पलायन केले. पोलिसांनी मुकुंदवाडी भागातून सोन्याचा ऐवज जप्त केला आहे.