सकाळी किचनमध्ये नीलमनी गळफास घेतला, तासाभरात सासुनेही दोन्ही हातांच्या नसा कापल्या

सातारा: कराड तालुक्यातील विंग येथे स्वयंपाकगृहात नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुनेच्या आत्महत्येनंतर सासूने हाताच्या नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी घडली. यानंतर संतप्त नवविवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्या घरासमोरच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नीलम अनिकेत माने (वय २१) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

तीन महिन्यांपूर्वीच तिचा विवाह झाला होता. सासू राणी अंकुश माने यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड येथील नीलमचा तीन महिन्यांपूर्वी विंग येथील अनिकेत मानेशी विवाह झाला होता. शनिवारी रात्री नीलम स्वयंपाकगृहात झोपली होती. तर पती अनिकेत, सासू राणी माने व सासरा अंकुश माने हे तिघे जण बाहेरच्या खोलीत झोपले होते.

रविवारी सकाळी सातच्या सुमारास नीलम दरवाजा उघडत नसल्याने कुटुंबियांनी दरवाजा तोडून स्वयंपाकगृहात प्रवेश केला.त्यावेळी नीलमने पत्र्याच्या अँगलला ओढणीच्या मदतीने गळफास लावून घेतल्याचे दिसले. ही घटना पाहून सासू राणी माने यांनी दोन्ही हातांच्या नसा कापून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कुटुंबियांनी त्यांना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले.

घटनेची माहिती मिळताच कराड तालुका पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. तसेच घटना समजल्यानंतर मृत नीलमचे माहेरचे नातेवाईक कराडला दाखल झाले. त्यांनी कराड तालुका पोलीस ठाणे व उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात गर्दी केली होती.

नीलमच्या मृतदेहावर तिच्या सासरच्या दारात अंत्यसंस्कार करण्याची मागणी नातेवाइकांनी केली. त्यामुळे तणावाचे वातावरण झाले होते. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून त्यांची समजूत काढण्यात येत होती. मात्र, नातेवाईक सासरच्या दारात अंत्यसंस्कार करण्याच्या निर्णयावर ठाम होते. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *