सकाळी बहिणीकडं नाष्टा केला मग थेट रेल्वेस्टेशन गाठलं अन् रेल्वेखाली दिला जीव

जळगाव: जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील रेल्वे स्टेशनजवळ दुचाकी उभी करुन धावत्या रेल्वेखाली एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी काल सकाळी उघडकीस आली. शेख इरफान शेख याकुब मनियार (वय-४५, रा. हाजी अहमद नगर, जळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

नातवाईकांनी दिलेल्या माहितीनसार, शेख इरफान शेख याकुब मानियार हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह हाजी अहमद नगर, सलार नगरजवळ वास्तव्याला होते. बांगड्यांचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत होते. त्यांचे सराफ बाजारातील भवानी माता मंदिराजवळ दुकान आहे. त्यांची पत्नी रूखसानाबी या मुजाहिद व जयद या दोन मुलांसह नंदूरबार येथे माहेरी कामानिमित्त गेल्या होत्या. त्यामुळे शेख इरफान घरी एकटेच होते.

गुरूवारी सकाळी ८ वाजता शेख इरफान दुचाकीने शिरसोली येथील मोठी बहिण मलेकाबी यांच्याकडे गेले. सकाळी नाष्टा करून माझ्यासाठी डबा पाठवून दे असे बहिणीला सांगून घराबाहेर पडले. तासाभरानंतर शिरसोली रेल्वे स्थानकाजवळ धावत्या रेल्वेखाली त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला व मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालयात हलविण्यात आला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई फातेमाबी, पत्नी रूखसानाबी, मुजाहिद व जयद ही दोन मुले, लहान भाऊ सलिम शेख व बहिणी असा परिवार आहे. घरात सर्व काही ठिक असताना शेख इरफान यांनी आत्महत्या का केली असा प्रश्न नातेवाईकांकडून उपस्थित केला जात आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *