“ सगळे एका माळेचे मणी….खुप हसु येतं, सकाळी सहाचे शपथविधी…काय चाललंय हे ‘

मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक अभिनेत्रींनी हिंदी मनोरंजनसृष्टीत आपल्या दमदार अभिनयानं एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या मराठमोळ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अनुजा साठे. हिंदी चित्रपट, मालिका, वेब सीरिज या तिन्ही माध्यमात अनुजानं काम केलं आहे. ‘बेगम’ ही अनुजाची सर्वाधिक गाजलेली वेब सीरिज आहे. अनुजा जशी तिच्या भूमिकेमुळे चर्चेत असते, तसेच ती तिच्या परखड मतांमुळेही चर्चेत असते. नुकतीच तिनं एक मुलाखत दिली. ज्यामध्ये ती सध्याच्या राजकीय परिस्थितीवर स्पष्टच बोलली आहे.

सिनेपत्रकार सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणे’ या चॅनलेवर झालेल्या अनुजाच्या मुलखातीचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री सध्याच्या राजकारणाविषयी बोलताना दिसतं आहे. ती म्हणाली की, “मला राजकारणात इंटरेस्ट नाहीये. मी लांबून बघेन.

आणि जे सध्या चाललंय त्याच्याबद्दल आपण फक्त मजाच घेऊ शकतो.” यावर सौमित्र पोटे विचारत की, “आता जे चाललंय त्याची मजा घेता येते तुला?” या प्रश्नावर अभिनेत्री म्हणते की, “मी खूप हसते. मला खूप हसू येतं. इथे मी पॉलिटिकली करेक्ट नाहीये. अजिबात नाहीये. पण मी गेले दोन-चार दिवस न्यूजमध्ये ज्या काही घडामोडी बघतेय. किंवा सकाळी सहाचे शपथविधी, हे पाहून मला हसू आलं. की काय चाललंय हे?”

पुढे सौमित्र पोटे विचारतात की, “अभिनेत्री म्हणून सोडून दे अनुजा म्हणून काय वाटतं? आपण इथेच राहतो आणि आपण त्यांना मत देतो. हे जे काय चाललंय तुझं काय मत आहे या सगळ्यावर?” तर अनुजा म्हणते, “माझं मत हे नोटावर आहे. कारण माझ्यासाठी सगळे एका माळेचे मणी आहेत,” असं परखड मत अनुजानं यावेळी मांडलं.

काही महिन्यांपूर्वी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीतही अनुजानं स्पष्ट मत मांडलं होत. “राजकारण, जात, धर्म यांबद्दल बोलण्याच्या ऐवजी मला समाजातील इतर समस्या, पाळीव प्राणी, वन्यजीवन याबद्दल व्यक्त व्हायला आवडेल,” असं अनुजा म्हणाली होती. दरम्यान २ जूनला अनुजाचा ‘फकाट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात ती अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेबरोबर दिसली होती.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *