सांगलीत नववीची श्रेया आई-वडिलांसोबत झोपलेली, गावात लाईट नाही अन् सकाळी तिचीचं निघाली अंत्ययात्रा
सांगली : सांगली जिल्ह्यातील (Sangli News) जत तालुक्यातील संख गावामध्ये अवघ्या 15 वर्षीय शाळकरी मुलीचा सर्पदंशाने करुण अंत झाल्याची धक्कादायक घटना घडली. झोपी गेली असतानाच सर्पदंश झाला. श्रेया श्रीशैल न्हावी (वय 15) असे या शाळकरी मुलीचं नाव आहे. शनिवारी रात्री हा प्रकार घडला.
सर्पदंश केल्यानंर श्रेया ओरडून जागी झाली. त्यानंतर नातेवाइकांनी रात्री दहा वाजता जत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी श्रेयाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. मिळालेल्या माहितीनुसार श्रेया आर. बी. पी. हायस्कूलमध्ये इयत्ता नववीच्या वर्गात शिकत होती. नेहमीप्रमाणे श्रेया झोपी गेली. यावेळी गावातील वीज गेली होती. यावेळी आठच्या सुमारास तिला सर्पदंश झाल्यानंतर ती जागी होऊन ओरडू लागली.
त्यानंतर कुटुंबीयांना खासगी रुग्णालयात तत्काळ नेले. तेथून तिला रात्री दहाच्या सुमारास जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिच्या निधनाचे वृत्त समजताच नातेवाइकांनी हंबरडा फोडला. रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद जत पोलिस ठाण्यात झाली आहे.
घरापासून हाकेच्या अंतरावर तरुणाचा गॅस स्टोव्ह डोक्यात घालून निर्घृण खून
दरम्यान, सांगली शहरात (Sangli Crime) संजयनगर झेंडा चौक परिसरात तरुणाच्या डोक्यात गॅस स्टोव्ह घालून निर्घृणपणे खून (Murder In Sangli) करण्यात आला. नितीन आनंदराव शिंदे (वय 32, रा. संजयनगर, सांगली) असे मृत तरुणाचे नाव आहे. किरकोळ वादातून हा खून चौघांनी केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. नितीनच्या घरासमोर हाकेच्या अंतरावर हा खून झाला. नितीन शिंदे संजयनगरमध्ये खेराडकर पेट्रोलपंपाजवळ झेंडा चौकात राहण्यास होता.
त्याची मालवाहतूक गाडी असून तो व्यवसाय करत होता. नितीनच्या वडिलांची वखार आहे. नितीन कामावरून परतल्यानंतर काल रविवारी सांयकाळी घराबाहेर पडला होता. त्यावेळी एका परप्रांतीयाच्या घराजवळ तो आला होता. त्या चौकात संशयित आले. त्यांच्यात किरकोळ कारणातून वादावादी झाली. त्यानंतर अर्धा तासाने नितीन घरात गेला. त्यावेळी संशयित पुन्हा दुचाकीवरून आले. त्यानंतर पुन्हा वाद झाला. वाद टोकाला गेल्यानंतर संशयितांनी तेथील गॅस स्टोव्ह उचलून नितीनच्या डोक्यात घातला. एकच वर्मी घाव बसल्याने नितीन रक्ताच्या थारोळ्यात पडला.