साऊथ इंडस्ट्रीला मोठा धक्का, अभिनेते चंद्र मोहन यांचं निधन

मुंबई : सिने इंडस्ट्रीतून दु:खद बातमी समोर आली आहे. तेलुगू सिनेमातील लोकप्रिय अभिनेते चंद्र मोहन यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८२व्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हैदराबाद अपोलो रुग्णालयात शनिवारी सकाळी ९.४५ वाजता कार्डियक अरेस्टने त्यांचं निधन झालं. चंद्र मोहन यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. मात्र शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली.चंद्र मोहन यांच्या मागे त्यांची पत्नी जलंधरा आणि दोन मुली असं कुटुंब आहे. त्यांच्यावर सोमवारी हैदराबादमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

चंद्र मोहन तेलुगू सिनेमातील त्यांच्या अभिनयासाठी ओळखले जातात. त्यांनी एका फिल्मफेयर अवॉर्डसह दोन नंदी अवॉर्ड जिंकले होते. त्यांनी रंगुला रत्नम सारख्या सुपरहिट सिनेमातून मोठी प्रसिद्धी मिळवली होती. त्यांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं होतं. साऊथ इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी काम केलं होतं. त्यांच्या जाण्याने साऊथ इंडस्ट्रीतून अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

चंद्र मोहन यांच्या निधनाच्या बातमीनंतर इंडस्ट्रीत शोक व्यक्त केला जात आहे. चंद्र मोहन यांच्या निधनावर साऊथ सुपरस्टार ज्यूनियर एनटीआर यांनी पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केलं आहे.अनेक दशकं सिनेमात विविध भूमिका साकारुन आपली खास ओळख बनवणारे चंद्र मोहन यांच्या आकस्मिक निधनाने अतिशय दु:ख झालं आहे. त्यांच्या कुटुंबाप्रती मनापासून संवेदना असून त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *