साताऱ्याचे सुपुत्र सुरज शेळके यांना लडाखमध्ये कर्तव्य बजावताना वीरमरण!

खटाव : सीमेवर सेवा बजावताना लडाख येथे येथे महाराष्ट्रातील एका जवानाला वीरमरण आले. शहीद जवान सातारा जिल्ह्यातील खटाव येथील आहे. जवान सूरज प्रताप शेळके (वय २३) असे शहीद जवानाचे नाव आहे. त्यांच्या निधनामुळे खटाव परिसरात शोककळा पसरली. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांचे निधन झाल्याचे लष्कराकडून शेळके कुटुंबाला कळविण्यात आले. गेल्या चार दिवसांपासून ते आजारी होते.

जवान सुरज शेळके यांचे माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण खटाव येथे झाले होते. साडेतीन वर्षांपूर्वी ते लष्करात भरती झाले होते. सध्या ते आरटी रेजिमेंटमध्ये कर्तव्य बजावत होते. अडीच महिन्यांपूर्वी ते गावी खटावला सुट्टीवर आले होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. लष्करी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. आजारातून बरे झाल्यावर ते कर्तव्यावर रुजू झाले होते.

मात्र गुरुवारी सायंकाळी चार वाजता जवान सुरज यांना अचानक त्रास झाल्याने त्यांना वीरमरण आले. सध्या लेह लडाखमध्ये वातावरण खराब असल्याने जवान सुरज यांचे पार्थिव लष्करी तळावर आणण्यात अडचणी निर्माण होत आहेत. सुरुवातीला दिल्ली नंतर पुणे येथे विमानाने त्यांचे पार्थिव आणण्यात येणार आहे. रविवारी सकाळी जवान सुरज यांचे पार्थिव खटाव येथे आणण्यात येणार आहे. मनमिळावू जवान सुरज यांचे अचानक निधन झाल्याने खटाव व परिसरावर शोककळा पसरली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *