साताऱ्यातील अवघ्या २२ वर्षी जवानाचा मृत्यू; ५ दिवसांपूर्वीच यात्रा साजरा करून गेला अन् घात झाला!

सातारा : सातारा जिल्ह्यातील करंदोशी (ता. जावळी) गावातील तेजस लहुराज मानकर (वय २२) हा जवान पंजाब भटिंडा कॅम्पमध्ये सेवा बजावत असताना डोक्यात गोळी लागून शहीद झाला आहे. तेजसला उपचारासाठी मिल्ट्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. कॅम्पमध्ये झालेल्या गोळीबारात एकूण चार जवान शहीद झाले असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

तेजस मानकर हा नुकताच यात्रेनिमित्त सुट्टी घेऊन गावी आला होता. पुन्हा सेवेत रुजू होण्यासाठी तो पाचच दिवसांपूर्वी गेला. मात्र आता त्याच्या निधनाचे वृत्त समजताच जावली तालुक्यासह संपूर्ण सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली.

जवान तेजस याचे वडील सैन्यदलात मेजर पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत, तर भाऊ सैन्यदलात कर्नल पदावर कार्यरत आहे. तसेच चुलते शशिकांत मानकर हे सुद्धा सैन्य दलात सेवा बजावत आहेत. आई मनीषा मानकर गृहिणी आहेत. सैन्यदलातून देशसेवा करण्याची परंपरा या मानकर कुटुंबात आहे. दोन वर्षांपूर्वी तेजस सैन्य दलात दाखल झाला होता. पुणे येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर त्याची पंजाब भटिंडा येथे नियुक्ती करण्यात आली होती.

याबाबत ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तेजस नुकताच यात्रेनिमित्त सुट्टी घेऊन गावी आला होता. पुन्हा सेवेत रुजू होण्यासाठी तो पाचच दिवसांपूर्वी गेला होता. यात्रेदरम्यान तेजसने नातेवाईक आणि मित्र परिवारासोबत केलेल्या मौजमजा व गप्पागोष्टीच्या आठवणी अगदी ताज्या असतानाच तो शहीद झाल्याचे वृत्त समजताच सारा परिसर गहिवरला.

तेजसचे प्राथमिक शिक्षण करंदोशी गावी झाले. अत्यंत हुशार, हजरजबाबी व मनमिळाऊ स्वभाव असल्यामुळे त्याचा मित्र परिवार मोठा आहे. परंतु नंतर वडिलांच्या सेवा काळात त्यांच्यासोबत विविध ठिकाणी त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. वडील आणि भावाप्रमाणे आपणही आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी तो वर्षापूर्वी सैन्य दलात भरती झाला होता. मात्र पंजाबमधील भटिंडा जिल्ह्यातील लष्करी छावणीमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. देशातील सर्वात मोठी लष्करी छावणी असणाऱ्या भटिंडा छावणीत बुधवारी सकाळी ४:३० वाजता घडलेल्या घटनेत एकूण ४ जवान शहीद झाले. या चार जवानांमध्ये सातारा जिल्ह्यातील जवान तेजसचा समावेश आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *