साताऱ्यातील घटनेनी पुरंदर सुन्न, हाथाखाली आलेली लेकरं एका मिनीटात गेली, गावकर्यांनी यात्राही थांबली

पुणे : पुरंदर तालुक्यातील पिंपरे आणि थोपटेवाडी येथील नागरिकांची सकाळ दुःखद घटनेने झाली. साताऱ्यातील लोणंद येथे एसटी आणि बाईक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात गावातील तीन तरुणांचा अकस्मात मृत्यू झाला. तिन्ही तरुण हे वडिलांच्या हाताखाली आलेली. तिघंही आई वडिलांची एकुलती एक लेकरं होती. त्यामुळे तिन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मोटारसायकलवरील ओंकार संजय थोपटे, पोपट थोपटे, अनिल नामदेव थोपटे (सर्व रा. पिंपरे बु. थोपटेवाडी, ता. पुरंदर) हे तीन युवक जागीच ठार झाले. या गावात राहणाऱ्या सर्वसामान्य घरातल्या शेतकरी कुटुंबातील हे तरुण. काहींनी नुकतेच कॉलेज पूर्ण केले होते तर काही जण कॉलेजला जात होते.

कामानिमित्त ते लोणंद या ठिकाणी गेले होते. मात्र घरी परतत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. लोणंद -निरा रोडवर लोणंदपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाजवळ मंगळवेढाहून पुण्याकडे निघालेली एसटी बस (क्रमांक एमएच २०बीएल ४१५८) व निरेकडून लोणंद निघालेली मोटारसायकल (क्रमांक एमएच १२ आरव्ही ३१५८) यांच्यात जोरदार धडक झाली. त्यात तिघांचा जागेवरच मृत्यू झाला.

थोपटेवाडी ग्रामदैवत असलेल्या हनुमानाचा यात्रा उत्सव सुरू होता. मात्र मुलं गेल्याची खबर येताच संपूर्ण यात्रेवर शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर यात्रा थांबवण्यात आली. सर्व गाव थोपटे कुटुंबाच्या दुःखात सहभागी झाले आहे. तिन्ही कुटुंबातील ही एकुलती एक मुलं असल्याने आई वडिलांवर आभाळच फाटलं आहे.

लोणंद येथे मोठी बाजारपेठ असल्याने पुरंदर तालुक्यातील अनेक नागरिक येथे ये-जा करत असतात. पुरंदर तालुक्यातून हे ठिकाण जवळ असल्याने कामानिमित्ताने लोक जात असतात. हे तिन्ही तरुण कामनिमित तिकडे गेले होते. मात्र रस्त्याच्या एका वळणावर त्यांचा भीषण अपघात झाला आणि त्यात त्यांना आपले प्रमाण गमवावे लागले. लोणंद पोलीस घटनास्थळी पोहचले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेत शव विच्छेदनासाठी लोणंद येथील सरकारी दवाखान्यात पाठवले आहेत.

तरुणांनी गाडी चालवताना काळजी घ्यावी
आपल्या आजूबाजूला तरुणांचे अपघात होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. मात्र याला कधी कधी तरुण देखील कारणीभूत असतात. कारण भरधाव वेगाने गाडी चालवणे, नंतर ती जोरात असलेली गाडी कंट्रोल न होणे यामुळे समोर असलेल्या वाहनांना जाऊन धडकणे आणि आपला जीव गमावणे अशा घटना घडतात. त्यामुळे वाहने चालवताना सावकाश चालवणे गरजेचे आहे. निदान आपल्या पाठीमागे आपले कुटुंब वाट पहात असते याची तरी जाणीव मुलांना असणे गरजेचे आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *