सून माहेरी, वडिलांनी ७५ हजारांची सुपारी देऊन मुलाला संपवलं, बॉडी ट्रॅकवर टाकली; कोल्हापुरात वडिलांनी सत्य कारण उघडलं

कोल्हापूर : तारदाळ (ता. हातकणंगले) येथे वडिलांनीच सुपारी देऊन मुलाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राहुल दिलीप कोळी (वय ३१ वर्ष, रा. कोळी गल्ली, तारदाळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या वडिलांनीच ७५ हजार रुपयांना सुपारी देऊन दोन साथीदारांसह खून केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक समीरसिंग साळवे यांनी दिली.

शहापूर पोलिसांनी या प्रकरणी रात्री उशिरा खुनाचा गुन्हाचा दाखल करत संशयित दिलीप कोळी, विकास पोवार (दोघे रा. तारदाळ), सतीश कांबळे (रा. तमदलगे) यांना ताब्यात घेतले असून अवघ्या काही तासांतच पोलिसांनी खुनाचा प्रकार उघडकीस आणला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तारदाळ ता. हातकणंगले येथील संशयीत आरोपी दिलीप कोळी याचा मुलगा राहुल कोळी राहत होता. तो विवाहित असून सतत मद्यपान करून कुटुंबाला त्रास देत होता. सततच्या त्रासाने त्याची पत्नी मुलांसह माहेरी निघून गेली होती. तर राहुलच्या वागण्याला आई-वडील ही कंटाळले होते. यावरून राहुलचे कुटुंबीयांसोबत नेहमी भांडणे व्हायची.काल पहाटेच्या सुमारास आयकॉनिक कंपनीच्या मागील बाजूस रेल्वे पटरीच्या लगत तारदाळ माळावर राहुलचा मृतदेह आढळल्याची माहिती शहापूर पोलिसांना समजली.

दरम्यान प्रथमदर्शी रेल्वेला धडक बसून मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला; मात्र मृतदेहाच्या डोक्यावरचे वर्मी घाव आणि काही अंतरापर्यंत रक्ताचे थेंब अन् थारोळे दिसून आले. दरम्यान घटनास्थळाची पाहणी करत घातपात झाल्याचा संशय आल्याने त्यादृष्टीने तपास सुरू केला. त्यानुसार पोलिसांनी राहुलच्या नातेवाईकांकडे चौकशी करत वडील दिलीप, भाऊ सचिन यांच्याकडे विचारणा केली. यावेळी चौकशीत पोलिसांना वडिलांचा दाट संशय आला. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, रात्री उशिरा कौटुंबिक वादातून वडील दिलीप कोळी यांनी दोन साथीदारांसह राहुलचा खून केल्याची कबुली दिली.

तसेच एकूण रोख ७५ हजार रुपये विकास पोवार व सतीश कांबळे यांना दिले असल्याचे सांगत यासाठी सुरुवातीला २५ हजार रुपये दिले आणि उर्वरित रक्कम खून झाल्यानंतर देण्याचा व्यवहार झाल्याची स्पष्टता दिलीप कोळी याने तपासात दिली असून अवघ्या काही तासातच आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसाना यश आले.

दरम्यान या कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक माळी, योगेश अवघडे, प्रमोद भांगरे, आरीफ वडगावे, शशिकांत डोणे, असिफ कलेगार यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *