‘सॉरी दादा सगळीकडून अडकत चाललोय, शपथ आहे तुला ११ वाजायच्या आत… भावाला मेसेज करुन आत्महत्या

सातारा : ‘सॉरी दादा मी या आयुष्याला वैतागलोय’ सगळीकडून मी अडकत चाललो आहे. याच्यापुढे तुम्हाला सगळ्यांना त्रास नको व हा मेसेज कोणाला दाखवू नको. डीलीट कर. पप्पांना साॅरी सांग, असा मेसेज सख्ख्या थोरल्या भावाला करून धाकट्या भावाने आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना बुधवारी सकाळी सहा वाजता महाबळेश्वर येथे उघडकीस आली.

किरण दत्तात्रय शिंगरे (वय २२, रा. मेटतळे, ता. महाबळेश्वर, जि. सातारा) असे आत्महत्या केलेल्या धाकट्या भावाचे नाव आहे. याबाबत महाबळेश्वर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महाबळेश्वर शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर मेटतळे हे गाव आहे. या गावातील गणेश दत्तात्रय शिंगरे (वय ३२) याचा लहान भाऊ किरण शिंगरे हा काम नसल्यामुळे घरीच असायचा.

मंगळवारी रात्री नऊ वाजता किरण हा त्याच्या खोलीमध्ये नेहमीप्रमाणे झोपण्यासाठी गेला. तर त्याच्या शेजारच्या खोलीमध्ये त्याचा मोठा भाऊ गणेश हा झोपण्यासाठी गेला. सकाळी सहा वाजता गणेशला जाग आली. त्यावेळी त्याने व्हाँट्सअँप पाहिले असता त्याच्या लहान भाऊ किरणने त्याला मेसेज पाठविल्याचे दिसले.

हा मेसेज त्याने रात्री पावणेबारा वाजता व्हॅाट्सअँपवर पाठविला होता. मेसेजमध्ये लिहिलं होतं, ‘सॉरी दादा मी या आयुष्याला वैतागलोय. सगळीकडून मी अडकत चाललो आहे. याच्यापुढे तुम्हाला सगळ्यांना त्रास नको व हा मेसेज कोणाला दाखवू नको. डीलीट कर. पप्पांना साॅरी सांग.

मी मोबाइल अँपवरून ऑनलाइन लोन घेतलेले असून, ते मला फेडता येत नाही. ते सकाळी अकरा वाजायच्या आत भरून टाक. माझी शपथ आहे. कोणाला सांगू नको. मिस यू,’ असा उल्लेख होता.हा मेसेज पाहून थोरल्या भावाच्या पायाखालची जमीन सरकली. त्याच्या रूमकडे तो धावतच गेला. त्याला हाक मारली व दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा दरवाजा आतून बंद होता.

त्यानंतर गणेशने आरडाओरड करत घरातील सर्वांना हाक मारली. तसे सगळेजण झोपेतून जागे झाले. व्हॅाट्सअँपवरील मेसेज त्याने त्यांना दाखविला. सर्वांनी मिळून किरणच्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु दरवाजा आतून उघडत नव्हता म्हणून सर्वांनी मिळून तो दरवाजा अखेर तोडला. त्याच्या खोलीमध्ये त्यांनी प्रवेश केला असता घरातील अँगलला नायलॉनच्या रस्सीने किरणने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याची कोणतीही हालचाल दिसत नव्हती. त्यानंतर गणेश आणि त्याच्या शेजारील लोकांनी घरातील कोयत्याच्या साह्याने गळफासाची रस्सी कापून त्याला खाली उतरवले.

किरणचा मृतदेह महाबळेश्वरमधील ग्रामीण रुग्णालय नेण्यात आला. ‘त्याला’ शेवटचे पाहण्यासाठी मित्र धावले… किरणच्या मृतदेहाचे दुपारी शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. संध्याकाळी सहा वाजता मेटतळे गावात किरणवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महाबळेश्वर शहरातील त्याच्या मित्रांनी किरणला शेवटचे पाहण्यासाठी गर्दी केली होती.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *