सोलापुरात APIपदी बढती, पण पोलीसानं घराच्या अंगणातचं स्वत:वर गोळी झाडली; तपासातून मृत्यूचं कारण समोर
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात नांदेड येथील एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. आनंद प्रकाश मळाले (वय ४७ वर्ष, रा.सम्राट अशोक हौसिंग सोसायटी, कुमठा नाका, सोलापूर) असं पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. आनंद मळाले हे नांदेड पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते.
ही घटना पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने राहत्या घरी आत्महत्या केल्याची बाब सदर बाजार पोलीस ठाण्याला कळताच सोलापूर पोलीस दलातील सर्वच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. एपी.आय मुनिर मुल्ला यांनी आनंद मळाले यांना पहाटेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
नांदेड पोलीस दलातील अधिकारी आनंद मळाले हे गेल्या अनेक दिवसांपासून रजेवर होते. पत्नी, एक मुलगा असा त्यांचा परिवार आहे. शनिवारी पहाटे राहत्या घरी त्यांनी नैराश्यात सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून स्वतःवर गोळी झाडली. त्यांच्या पत्नीला गोळीचा आवाज आल्याने त्या बाहेर अंगणात धावत आल्या. पत्नीच्या डोळ्यासमोर आनंद मळाले रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पत्नीने जोरात आरडाओरड करत घरातील आणि इतर नातेवाईकांना, शेजाऱ्यांना बोलावून घेतले.
सदर बाजार पोलीस ठाण्याला ही घटना कळताच ताबडतोब पोलीस अधिकाऱ्यांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. एपी.आय मुनिर मुल्ला यांनी आनंद मळाले यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे. सोलापूर पोलीस दलातील उपायुक्त विजय कबाडे, एसी.पी राजू मोरे, पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर आदी घटनास्थळी दाखल झाले होते.
एसीपी. राजू मोरे यांनी दुःख व्यक्त करत प्रतिक्रिया दिली. घडलेली घटना खूपच वाईट आहे. आयुष्यामध्ये कोणत्याही संकटावर उत्तर मिळू शकते. कुटुंबीयांशी, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी, सहकारी मित्रांशी चर्चा केली असती तर आज आनंद मळाले यांच्यासोबत ही घटना घडली नसती. जीवनात प्रत्येक माणसाला कामाचा ताण, टेन्शन आहेच. प्रत्येकाने सकारात्मक राहून आयुष्य जगणे आवश्यक आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद मळाले हे सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयामध्ये अनेक वर्ष पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन ते पोलीस उपनिरीक्षक झाले. त्यांनी सोलापूर शहर वाहतूक शाखा आणि सदर बाजार या ठिकाणी सेवा बजावली आहे. पुणे येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवा बजावल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नांदेड येथे त्यांची पदोन्नती झाली होती.