स्मशानभूमीत होते, मुलींच्या ओरडण्याचा आवाज आला अन् थेट धरणात उडी घेतली, माताळेंनी ५ जणींना कसं वाचवलं?

पुणे : पुण्यातील गोऱ्हे खुर्द गावाच्या हद्दीत खडकवासला धरणात बुडून दोन मुलींचा मृत्यू झाल्याची अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानिमित्त बुलढाण्याहून आलेल्या नऊ मुली कपडे धुण्यासाठी नदीकाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांच्यापैकी एक मुलगी पाय घसरून पाण्यात पडली, तर तिला वाचवण्यासाठी आठ जणींनी पाण्यात उडी घेतली. मात्र दुर्दैवाने त्याही पाण्यात बुडू लागल्या. परंतु सात जणींचे प्राण वाचले असून दोघी जणींना जलसमाधी मिळाली. नऊपैकी आठ जणींचे वय १६ वर्षांखालील होते.

यातील चार मुली व एक महिला अशा पाच जणींना एका धाडसी शेतकऱ्याच्या प्रसंगावधानामुळे जीवदान मिळाले आहे. संजय सिताराम माताळे (वय ५३, रा. गोऱ्हे खुर्द ता. हवेली) असे या देवदूत बनून आलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. माताळे यांच्या कृत्याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास स्मशानभूमीत सावडण्याचा विधी सुरू होता. या विधीला संजय माताळे उपस्थित होते. अचानक संजय माताळे यांच्या कानावर काही मुलींच्या ओरडण्याचा आवाज पडला. त्यानंतर माताळे यांच्यासह तिथे उपस्थितांना धरणाच्या भिंतीजवळ गेल्यावर मुली बुडत असल्याचे दिसले. त्यावर माताळे यांनी धावत जाऊन पाण्यात उडी मारली.

तोपर्यंत मुलींच्या नाका तोंडामध्ये पाणी गेल्याने बेशुद्ध पडल्या होत्या. त्यामुळे त्यांना बाहेर काढणे कठीण झाले होते. पण एक एक करून 4 मुलींना आणि एका महिलेला बाहेर आणल्यावर, त्या सर्व मुलींना तात्काळ रूग्णालयात दाखल केले. पण दोन मुलींचा जीव वाचवू शकलो नाही. या गोष्टीची खंत कायम राहील, अशी भावना यावेळी माताळे संजय यांनी व्यक्त केली.

ओरडण्याचा आवाज आला तसा मी पळालो आणि पाण्यात उडी घेतली. माझ्या मागे काही लोक मदतीसाठी आले होते. पाच जणींना मी बेशुद्ध अवस्थेत पाण्याबाहेर काढले व काठावर थांबलेल्यांकडे दिले. दोघी माझ्या हाताला लागल्या नाहीत. मित्र, नातेवाईक खूप फोन करत आहेत. खूप चांगलं काम केलं असं म्हणत आहेत. पण माझे डोळे भरुन येत आहेत, अशा भावना व्यक्त करताना संजय माताळे यांचे डोळे पाण्याने डबडबले होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *