हृदयद्रावक! निकालाच्या दोन दिवस आधी सारंगच संपल जीवन; दहावीचा टॉपर ६ जणांना जीवदान देऊन गेला

थिरुअनंतपुरम: केरळमध्ये दहावीच्या परिक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच सारंगचा मृत्यू झाला. निकालाला अवघे काही दिवस असताना त्यानं जगाचा निरोप घेतला. केरळ एसएसएलसी परीक्षेत सारंग पहिला आला. तो अत्तिंगलच्या सरकारी शाळेत शिकत होता. सहा महिन्यांपूर्वी सारंग त्याच्या आईसोबत रिक्षातून प्रवास करत होता. कुन्नाथुकोनम पुलाजवळ त्यांच्या रिक्षाला अपघात झाला. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू होते.

केरळ एसएसएलसी टॉपर बी. आर. सारंगच्या अकाली निधनानंतर त्याच्या आई, वडिलांनी त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सहा जणांचा जीव वाचला. त्यांना नवं आयुष्य मिळालं. सारंगचे आई, वडील डोळे, यकृत, हृदय , बोन मॅरो दान करण्यास तयार झाले. सारंगचं हृदय दुसऱ्या दिवशी कोट्टायममधील एका मुलाला देण्यात आलं. अवयन दानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सारंगचं पार्थिव त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आलं.

सारंग अतिशय उत्तम फुटबॉल खेळायचा. एटिंगलमध्ये असलेल्या केरला ब्लास्टर्सच्या प्रशिक्षण शिबिरात जाण्याची त्याची इच्छा होती. रुग्णालयात उपचार घेत असताना त्यानं फुटबॉल खेळण्यासाठी नवे बूट खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. वंचियूरमध्ये राहणाऱ्या सारंगच्या निधनामुळे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सारंगला अंतिम निरोप देण्यासाठी शेकडो विद्यार्थी आणि स्थानिक जमले होते.

राज्याचे शिक्षण मंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत दहावीचे निकाल जाहीर केले. पत्रकार परिषदेदरम्यान शिवनकुट्टी काहीसे भावुक झाले. परीक्षेत सारंग पहिला आला आहे. मात्र तो आज या जगात नाही, असं शिवनकुट्टी म्हणाले. त्यावेळी त्यांचे डोळे पाणावले. ‘थिरुअनंतपुरममध्ये एका दुर्घटनेत दहावीचा विद्यार्थी असलेला सारंग जखमी झाला. उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. दहावीच्या परिक्षेत ए प्लस श्रेणी मिळवून तो उत्तीर्ण झाला आहे. विशेष म्हणजे ग्रेस मार्क्स न मिळवता त्यानं ही कामगिरी केली आहे,’ असं शिक्षणमंत्री म्हणाले. यावेळी त्यांनी सारंगच्या कुटुंबाबद्दल सहवेदना व्यक्त केल्या.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *