ह्रदयद्रावक! खो-खो खेळतांना १३ वर्षाच्या शशांकच संपल जीवन, अटॅकने अचानक निपचित पडला
बंगळुरू: कर्नाटकच्या म्हैसूरमध्ये १३ वर्षीय मुलगा खो खो खेळत असताना अचानक कोसळला. नानजानगुड तालुक्यात घडलेली ही घटना मैदानाजवळ असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली. हरादानाहल्ली गावात वास्तव्यास असलेला, इयत्ता नववीत शिकणारा शशांक सरकारी शाळेचा विद्यार्थी होता. शाळेतून घरी आल्यानंतर तो मित्रांसोबत खो खो खेळायला बाहेर पडला.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये शशांक त्याच्या मित्रांसोबत मैदानात खो खो खेळताना दिसत आहे. खेळाडू एकमेकांना खो देत होते. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूला बाद करण्याचे प्रयत्न सुरू होते. आपल्याला खो मिळेल याची वाट पाहत असणारा शशांक अचानक खाली कोसळला. तो जमिनीवर आडवा झाला.
एकाएकी जमिनीवर कोसळलेल्या शशांकला पाहून त्याच्या संघासह प्रतिस्पर्धी खेळाडूदेखील धावले. शशांकला तातडीनं हमापापुरा प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्याच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. तिथून त्याला के. आर. रुग्णालयात हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या. मात्र तिथे नेत असतानाच त्यानं अखेरचा श्वास घेतला. शशांकच्या मृत्यूचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. परंतु ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं एकंदरीत कळतयं. या प्रकरणी त्याच्या कुटुंबियांनी कोणतीही तक्रार नोंदवलेली नाही.