२ दिवसांपुर्वी लग्न झालेल्या नववधुसह सख्या भावांना एकाच चितेवर अग्नी, ३००० लोकसंख्या असलेलं अख्ख गाव बंद

उमरखेड (यवतमाळ) : लग्नानंतर लेकीला ‘सासर’ करताना लग्नघर व्याकुळ होते. मात्र तालुक्यातील साखरा या संपूर्ण गावालाच लेकीच्या जाण्याने दु:खाच्या डोहात बुडवून टाकले. कारण या गावातील लेक लग्नानंतर केवळ सासरी नव्हे, तर जगातूनच कायमची निघून गेली. सोमवारी लग्नाच्या अवघ्या तिसऱ्या दिवशी वाहन अपघातात नव्या नवरीसह पाचजणांचा मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण साखरा गावात सामसूम असून गावात एकाही घरी चूल पेटली नाही.

साखरा येथील ज्ञानेश्वर पामलवाड यांची मुलगी पूजा हिचा विवाह १९ तारखेला जारीकोट ता. धर्माबाद, जि. नांदेड येथील नागेश साहेबराव कन्हेवाड यांच्याशी पार पडला. लग्नानंतर नवरी-नवरदेव आपल्या गावाकडे परत गेले. मात्र रितीरिवाजाप्रमाणे नववधूला मांडव परतणीसाठी पुन्हा माहेरी आणण्यासाठी सोमवारी २१ तारखेला माहेरकडील मंडळी गेली होती.

नववधू व नवरदेव यांना घेऊन ते सर्वजण एमएच-२९-एआर-३२१९ क्रमांकाच्या वाहनाने साखरा गावाकडे येत होते. मात्र सोमठाणा शिवारात चटलावार यांच्या ढाब्यासमोर त्यांच्या वाहनाला अपघात झाला. हिमायतनगरकडून नांदेडकडे विटा घेऊन निघालेल्या टाटा-४०७ या वाहनाने त्यांना कारला धडक दिली.

त्यात पूजा ज्ञानेश्वर पामलवाड ही नववधू, दत्ता ज्ञानेश्वर पामलवाड हा तिचा सख्खा भाऊ, तसेच संतोष परमेश्वर पामलवाड हा चुलत भाऊ हे जागीच ठार झाले. तसेच गाडी चालक सुनील दिगांबर धोटे रा. चालगणी याचाही या भीषण अपघातात मृत्यू झाला.मंगळवारी पूजा, दत्ता आणि संतोष या तीनही बहीण- भावांच्या मृतदेहांंना साखरा गावात एकाच चितेवर अग्नी देण्यात आला. यावेळी साखरा गावासह संपूर्ण पंचक्रोशीतील गावकरी उपस्थित होते.

सुनीलच्या मृत्यूने चालगणी भावविवश
या अपघातात दगावलेला वाहनचालक सुनील दिगांबर धोटे (३०) हा चालगणी येथील रहिवासी होता. घरातील परिस्थिती जेमतेम असल्याने वाहन चालवून तो आपल्या कुटुंबाची गुजराण करीत होता. त्याच्या पार्थिवावर चालगणी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आहे. चालगणी गावात प्रत्येकाला मदत करणारा, कुणाच्याही आजारात रात्री-अपरात्री धावून जाणारा रुग्णसेवक म्हणून सुनीलची ओळख होती. त्याच्या मृत्यूने संपूर्ण चालगणी गाव हळहळत आहे.

मुलगा गेला, मुलगी गेली, उरले सुने घर
या अपघाताने ज्ञानेश्वर व साधना पामलवाड यांची मुलगी पूजा आणि मुलगा दत्ता या दोघांनाही हिरावून नेले. मुलीचे लग्न आटोपून महत्त्वाची जबाबदारी पार पाडल्याच्या आनंदात हे आई-वडील होते. आता एकुलता एक मुलगा दत्ता याच्या आधाराने पुढचे जीवन आनंदात घालवायचे त्यांचे दिवस आले होते. मात्र नियतीने त्यांच्यावर घाला घातला.

नवरदेवाची मृत्यूशी झुंज सुरू
भोकरजवळ झालेल्या वाहन अपघातात नववधू पूजा हिचा जागीच मृत्यू झाला, तर नवरदेव नागेश साहेबराव कन्हेवाड हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून ते मृत्यूशी झुंज देत आहेत.

बाजारपेठ राहिली बंद
सोमवारी रात्री झालेल्या अपघातात गावातील पाचजणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण साखरा गाव हळहळत आहे. मंगळवारी भरणारा येथील आठवडी बाजारही भरला नाही. गावात सुरू असलेली क्रिकेट सामन्यांची स्पर्धाही थांबविण्यात आली. साडेतीन हजार लोकसंख्येच्या साखरा गावातील सर्व दुकाने, हॉटेल, पानटपऱ्या, मेडिकल स्टोअर्स मंगळवारी दिवसभर बंद ठेवण्यात आले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *