२ लेकरं मृत आईला रात्रभर बिलगून झोपलेली, सातारा जिल्ह्यात😥मन हेलवणारी घटना घडली

सातारा: म्हसवड शहरात २९ वर्षीय विवाहितेची दारूच्या नशेतील तिच्या पतीने हत्या केल्याचे समोर आले आहे. पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून भिंतीवर डोके आपटून तिचा निर्घृण खून केला आहे. ही घटना दुपारी चार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच म्हसवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पत्नीच्या खून प्रकरणी पतीला शिताफीने अटक करून ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपाली धोंडीराम पुकळे (वय २९, रा. कोडलकरवाडी, म्हसवड) हिचा विवाह धोंडीराम पुकळे (रा. पुकळेवाडी ता. माण) याच्या बरोबर झाला होता. धोंडीराम आणि पत्नी दीपाली हे म्हसवड येथील सहकारनगर परिसरात कवी वस्तीनजीक एका बिल्डिंगमध्ये भाडोत्री राहत होते. दीपाली ही एमपीएससीचा अभ्यास करत होती.

दीपाली आणि धोंडीराम या दोघांना दोन मुले आहेत. काल रात्री धोंडीराम दारू पिऊन आला. दीपालीच्या चारित्र्याच्या संशयावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. या भांडणात धोंडीराम याने दीपालीचे डोके भिंत आणि जमिनीवर आपटले. या झटापटीत दीपालीच्या कान तसेच नाकातून रक्त आल्यावर त्याने तिला बेडवर झोपवले. मुलांना जवळ घेऊन त्यांनाही झोपवले. धोंडीराम मात्र रात्रभर बसून होता.

सकाळी मुलांना धोंडीरामनेच चहा, बिस्किटे दिली. मुले आईला उठवत असताना रोज भांडणे झाल्यावर रागारागाने आई झोपते त्याप्रमाणे झोपली आहे, असे मुलांना वाटले. तेव्हा धोंडीरामने मुलांना ११ वाजण्याच्या दरम्यान बाहेर खेळण्यास पाठवले. त्यानंतर स्वतःही दुपारी दोनच्या दरम्यान घराबाहेर गेला. त्यावेळी मुले घरी आली. त्यांनी आईला उठवले. मात्र, आई उठत नाही म्हणून ती रडू लागली. त्यानंतर शेजारी राहणारे लोक तेथे आले. त्यांनी पाहिले, तर दीपालीचा श्वास बंद पडला होता.

याबाबत कोडलकरवाडी येथे राहणाऱ्या दीपालीच्या आई-वडिलांना माहिती देताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी घटनेचा पंचनामा केला. पत्नीचा खून करून पती एका ठिकाणी दडून बसला होता. त्याला पोलिसांनी शिताफीने पत्नी दीपाली हिचा खून केल्याप्रकरणी अटक करून ताब्यात घेतले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ खुनाचा अधिक तपास करत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *