३ वर्षाच्या श्रेयांसीना नीट जगही पाहिलं नव्हतं त्याआधीचं भयानक वेदना; नागपुरातील ह्रदयद्रावक घटना
नागपूर: जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात विजेचा धक्का लागून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. यात अडीच वर्षाच्या मुलीसह ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रामटेक पोलीस ठाण्यांतर्गत संग्रामपूर येथे राहणारी श्रेयांसी गौरीशंकर म्हस्के ही तिच्या आजी-आजोबांकडे राहत होती. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास आजीच्या घरातील विहिरीजवळ खेळत असताना तिचा हात विहिरीच्या पंपाच्या मोटारीच्या तारेवर पडला. यामुळे तिला विजेचा जोरदार धक्का बसला आणि ती बेशुद्ध झाली.
तिला उपचारासाठी रामटेक येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथून तिला उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे रेफर करण्यात आले. जिथे डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले. रामटेक पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. रामटेक उपजिल्हा रुग्णालयात मृताचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
दुसरी घटना मनसर येथील ७५ वर्षीय दुष्यंत सीताराम चौकसे यांच्यासोबत घडली. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास दुष्यंत सीताराम चौकसे यांनी पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी बटण दाबताच त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि ते बेशुद्ध झाले.त्यांना रामटेक उपजिल्हा रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दोन्ही घटनांबाबत रामटेक पोलिसांनी आकस्मिक अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. लहान मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण पालकांच्या दुर्लक्षामुळे लहान मुलांच्या अपघाताच्या अनेक घटना समोर येत आहेत. यापूर्वीही नागपुरच्या हिंगणा येथे घरातील टीव्ही ऑन करत असताना सेट टॉप बॉक्सला स्पर्श झाल्याने एका ४ वर्षाच्या मुलाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता.