1 कोटीचा बंगला, शेत अन्…; 30 हजार पगार असलेल्या शांत वाटणार्या महिलेकडे सापडली 7 कोटींची संपत्ती
भोपाळ: मध्यप्रदेशात एक मोठं भ्रष्टाचाराचं प्रकरण समोर आलं आहे. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी गुरुवारी पहाटे लोकायुक्तांच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. एमपी पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशन (संविदा) मध्ये तैनात असलेल्या सहाय्यक अभियंता हेमा मीना यांच्या घरी पथकाने छापा टाकला. आतापर्यंत केलेल्या कारवाईनुसार या उपअभियंताकडे तब्बल सात कोटी रुपयांची मालमत्ती सापडून आली आहे. आता हेमा मीना यांची कारवाई होणार आहे.
पगार ३० हजार प्रॉपर्टी कोट्यवधींची
हेमा मीना यांचा पगार दरमहा फक्त ३० हजार रुपये आहे. त्यानंतरही त्यांनी कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमवली आहे. या महिला सहाय्यक अभियंत्याने आपल्या वडिलांच्या नावावर बहुतांश मालमत्ता खरेदी केल्या आहेत. पण, मुलीच्या नोकरीपूर्वी वडिलांची आर्थिक परिस्थिती तसी फारशी चांगली नव्हती.
लोकायुक्त टीमचे नेतृत्व करत असलेले डीएसपी संजय शुक्ला यांनी सांगितले की, हेमा मीना हाऊसिंग कॉर्पोरेशन, भोपाळच्या प्रभारी सहाय्यक अभियंता (कंत्राटी) म्हणून तैनात आहेत. २०२० मध्ये हेमा मीना यांच्याविरुद्ध बेहिशोबी मालमत्तेची तक्रार प्राप्त झाली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.
विशेष पोलीस आस्थापना भोपाळ विभाग (लोकायुक्त) भोपाळ यांनी या प्रकरणाचा तपास केला असता, हेमा मीना यांनी भोपाळमधील बिलखिरिया गावात २० हजार चौरस फूट जमीन आपल्या वडिलांच्या नावाने खरेदी केली होती आणि सुमारे एक कोटी रुपये खर्च करून इमारत बांधल्याचं आढळून आले. त्याशिवाय भोपाळ, रायसेन, विदिशा येथील विविध गावांमध्ये शेतजमीन खरेदी केली आहे.छाप्यादरम्यान लोकायुक्तांच्या पथकाला या महिला उपअभियंत्याच्या घरातून ३० लाख रुपयांचा टीव्ही सापडला. याशिवाय, तिचे एक आलिशान फार्म हाऊसही आहे. या फार्म हाऊसमध्ये ७० ते ८० गायी आढळून आल्या आहेत.
उत्पन्नापेक्षा ही मालमत्ता २३२ टक्के अधिक आहे
हेमा मीना यांनी हार्वेस्टर, भात पेरणी यंत्र, ट्रॅक्टर आणि इतर शेती उपकरणे खरेदी केली. लोकायुक्तांचे म्हणणे आहे की, सध्या हेमा मीना यांचे मासिक वेतन सुमारे ३० हजार रुपये आहे. हेमा मीना यांनी खरेदी केलेल्या मालमत्ता त्यांच्या कायदेशीर उत्पन्नापेक्षा २३२ टक्क्यांनी जास्त आहेत. याबाबत हेमा मीना यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनेक महागड्या गाड्या सापडल्या
या छाप्यात महिला उपअभियंत्याच्या घरुन अनेक महागड्या आलिशान गाड्या सापडून आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, महिला अधिकारी आपल्या बंगल्यातील नोकरांशी बोलण्यासाठी वॉकी टॉकी वापरत होती. नोकरांच्या म्हणण्यानुसार, ही महिला स्वतःची ओळख आयपीएस म्हणून सांगायची. ३० हजार रुपये पगार घेणाऱ्या महिलेच्या घरात अफाट संपत्ती पाहून लोकायुक्त टीमही हैराण झाली आहे.
कारवाई पूर्ण झाल्यानंतर एकूण मालमत्तेचे मूल्यांकन केले जाईल
या प्रकरणी भोपाळ येथील भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा विशेष न्यायालयाकडून सर्च वॉरंट मिळाल्यानंतर लोकायुक्त पथकाने बिलखिरिया येथील निवासस्थानासह तीन ठिकाणी कारवाई सुरू केली, ती अजूनही सुरूच आहे. आतापर्यंत सुमारे ५ ते ७ कोटींची मालमत्ता उघडकीस आली आहे. कारवाई पूर्ण झाल्यानंतर एकूण मालमत्तेचे मूल्यांकन केले जाईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.