30 एप्रिलला लग्न, घरदार लग्नाच्या तयारीत पण नवरदेवाचा मृतदेह पाहण्याची वेळ नातेवाईकांवर आली, सांगलीत काळीज पिळवटुन टाकणारी घटना

मिरज : सोनी (ता. मिरज) येथे विजेचा धक्का बसून अक्षय बाळासाहेब साखरे (वय २७) (रा. सिध्देवाडी) या महावितरणच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. अक्षय साखरे हे ट्रान्सफार्मरवर चढत असताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. खांबावरून खाली कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृत अक्षय यांचा साखरपुडा झाला होता. ३० एप्रिलला विवाह सोहळा ठरला होता. घरी लग्नाची तयारी सुरू असतानाचा त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

सोनी येथून एक किलोमीटर अंतरावर सोनी उपळावी रस्त्यावर अशोक चव्हाण यांच्या शेताजवळ महावितरणचा ट्रान्सफार्मर आहे. तेथील वीजपुरवठा खंडित झाल्याने गुरुवारी दुपारी चार वाजता अक्षय साखरे दुरुस्तीसाठी गेले होते. तेथून फोनवरून त्यांनी महावितरणच्या कार्यालयास ट्रान्सफार्मरचा वीजपुरवठा बंद करण्यास सांगितला.

वीजपुरवठा बंद झाल्याचे गृहीत धरून अक्षय खांबावर चढले, मात्र वीज पुरवठा सुरूच असल्याने त्यांना विजेचा जोरदार झटका बसला. ट्रान्सफार्मरवरून खाली पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अक्षय यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत या प्रकरणाची चौकशी होऊन संबंधितावर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सोनीचे ग्रामपंचायत सदस्य अरविंद पाटील यांनी दिला आहे.

सारे घरदार लग्नाच्या तयारीत अन् आक्रोश
अक्षय हा साखरे कुटुंबीयांचा एकुलता मुलगा होता. गेल्याच महिन्यात त्यांचा साखरपुडा झाला होता. ३० एप्रिलला लग्न होणार होते. घरात लग्नाची तयारी सुरू होती. अक्षयच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांचा आक्रोश सुरू होता.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *