PUBG ने बना दी जोडी! प्रेमापोटी पाकिस्तानी महिला थेट ४ लेकरांसह भारतात पण पुढं बेचारीचं डोकचं गरगरलं
नोएडा : प्रेमात वय, चेहरा काहीही पाहिलं जात नाही. खरंतर, प्रेमाला कारण कळत नाही किंवा सीमा हैदर म्हटल्याप्रमाणे प्रेम हे एकच कारण आहे. या मे महिन्यात २७ वर्षीय पाकिस्तानी महिला कराचीहून तिच्या ४ मुलांना घेऊन निघाली होती. त्यांनी दुबईला आणि काठमांडूला जोडणाऱ्या विमानात बसल्या. नेपाळच्या राजधानीतून त्या पोखरा इथं गेल्या. यानंतर त्यांनी एक बस पकडली ज्यामध्ये तपास न होता, न जुमानता बेकायदेशीरपणे भारतीय सीमा ओलांडण्यात त्या यशस्वी झाल्या.
PUBG खेळताना महिलेला झालं प्रेम…
खरंतर, चार मुलांसह प्रवास करणाऱ्या एका महिलेवर कोणलाही संशय आला नाही. पुढचा थांबा दिल्ली होता आणि थोड्याच अंतरावर तिचे गंतव्यस्थान होतं. ते म्हणजे ग्रेटर नोएडातील राबुपुरा इथं ३२ वर्षीय किराणा दुकानात काम करणाऱ्या सचिनचं घर. २०२० मध्ये करोनाच्या महामारीच्या काळात PUBG खेळताना ते दोघे फोनद्वारे भेटले होते आणि पाहिल्याच क्षणी दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. ते लग्न करणार होते पण एका वकिलाने हैदरबद्दल पोलिसांना माहिती दिली. रविवारी हे जोडपे हरियाणातील बल्लभगडला जात असताना त्यांना पकडलं गेलं.
लग्नाच्या कायदेशीर चौकशीने पाकिस्तानी महिलेच्या मागावर पोलीस…
रविवारी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सीमा हैदरने मे महिन्याच्या तिसर्या आठवड्यात भारतात प्रवेश केला होता. एक महिन्यापेक्षा जास्त काळ सचिनसोबत राहिल्या आणि त्याच्या घराजवळ स्थानिक वकिलाशी सल्लामसलत केली. वकिलाने याची माहिती पोलिसांना दिली.
“ती आणि तिची मुले (तीन मुली आणि एक मुलगा) पाकिस्तानी पासपोर्ट घेऊन आल्याचे मला दिसले तेव्हा मला धक्का बसला. ती भारतात लग्न करण्याच्या प्रोसेसबद्दल चौकशी करत होती. तिने सांगितले की तिला सचिनशी लग्न करायचं आहे,” अशी माहिती वकिलाने सोमवारी TOI ला सांगितले.
वकील आणि पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हैदरने दावा केला की ती पाकिस्तानमध्ये घरगुती अत्याचाराला बळी पडली आहे. “तिने सांगितले की, सौदी अरेबियात काम करणाऱ्या एका पाकिस्तानी माणसाशी तिचं लग्न झालं आणि तो तिला प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी मारहाण करायचा. ती म्हणाली की, ती चार वर्षांपासून त्याला भेटली नाही. तर तिचा भाऊ पाकिस्तानी सैन्यात असल्याची माहितीही तिने वकीलाला दिली.
गेल्या शुक्रवारी हैदरने वकिलाला भेटली होती. पण त्याने तिला तिच्या भारतीय व्हिसाबद्दल विचारताच ती निघून गेली. “माझा एक सहकारी त्यांचा पाठलाग करत होता. जेव्हा मला कळलं की ते रबुपुरा येथील एका घरात राहतात, तेव्हा मी पोलिसांना कळवले,” असं पुढे वकिलाने सांगितले.
अतिरिक्त सीपी (कायदा व सुव्यवस्था) सुरेशराव अरविंद कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदर आणि सचिन यांना रविवारी हरियाणाच्या बल्लभगढला जाणाऱ्या बसमधून ताब्यात घेण्यात आलं आणि चौकशीसाठी नोएडा इथे आणण्यात आले. “चौकशीदरम्यान, तिने सांगितले की तिने सिंध प्रांतातील खैरपूर येथील तिच्या आई-वडिलांचे घर १२ लाख रुपयांना विकले जेणेकरून ती सचिनशी लग्न करू शकेल.”
कुलकर्णी यांनी पुढे सांगितलं की, हैदर आणि मुलांनी नेपाळच्या व्हिसावर पाकिस्तानमधून प्रवास केला होता आणि प्रथम नेपाळमध्ये आणि नंतर भारतात बस बदलत राहिले. एकाने त्यांना यमुना एक्सप्रेसवेवर सोडले, जिथे सचिन तिची वाट पाहत होता. “नेपाळमधून भारतात जात असताना, तिने पोलीस आणि इतर सुरक्षा कर्मचार्यांना ती हिंदू असल्याचे सांगितले आणि तिचे पहिले नाव सीमा असा उल्लेख केला. तिच्यासोबत चार मुले असल्याने सीमेवरील पोलिसांनी अधिक लक्ष दिले नाही,” असंही तिने पोलिसांना सांगितलं.
रबुपुरा येथील एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सचिनने त्याचे कुटुंब राहत असलेल्या घरापासून वेगळे घर भाड्याने घेतले होते आणि हैदरची त्याची पत्नी म्हणून घरमालकाशी ओळख करून दिली होती. शुक्रवारी वकिलाच्या टीपनंतर सचिनचे फोन लोकेशन मथुरेला ट्रेस झाले. पोलिसांचा पाठलाग करताना यूपी एटीएस (दहशतवादविरोधी पथक) सोबत होते. अखेर रविवारी त्यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती पोलिसांनी पाकिस्तानी दूतावासाला दिली आहे तर केंद्रीय गुप्तचर यंत्रणा तपास करत आहेत.